मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत रायगडावर शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामागे राज ठाकरे यांनी शरद पवार इतिहासाचे जातीयकरण करत आहेत, असा आरोप केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका टिप्पणी सुरु झाली आहे. टीका करणाऱ्यांनी शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनी बांधली असा दावा केला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारे कागदोपत्री दावे केले जात आहेत. ही समाधी बांधण्यासाठी स्वतः लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाने याविषयीचे दस्तऐवज समोर आणले आहेत. सध्या या मंडळाचे आध्यक्ष रघुजीराजे आंग्रे (स्वराज्याचे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज) हे आहेत.
शिवतीर्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत केले आहे. त्यानंतर यावर टीकाटिप्पणी सुरु झाली. त्यावर राज ठाकरे यांनी सांगितलेली इतिहासकालीन बाब कशी योग्य आहे, याविषयी पुरावे श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाने दिले आहेत. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने बांधली, त्यासाठी त्यांनी श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली होती. हे मंडळ आजही कार्ररत आहे. शिवसमाधी संदर्भातील सगळे ब्रिटीशकालीन कागदपत्रे आणि पुरावे मंडळाकडे उपलब्ध आहेत. या मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे इतिहास संशोधक (ज्येष्ठ इतिहास संशोधक व नरवीर नावजी बलकवडे यांचे वंशज) आणि कार्यवाह सुधीर थोरात हे आहेत. श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाला ही समाधी बांधण्यासाठी ब्रिटीशांशी मोठा संघर्ष करावा लागला. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरील ही माहिती उपलब्ध आहे, असे श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाने म्हटले आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?)
श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थापनेची पार्श्वभूमी
लोकमान्यांचा पुढाकार श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने १८९५ साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन ही स्थापना केली गेली. त्यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तूंची देखभाल, दुरुस्ती व जीर्णोद्धार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला आणि किल्ले रायगडही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. ब्रिटिशांनी सर्वच किल्ल्यांवर जायला बंदी आणली. या काळात रायगड पूर्णतः दुर्लक्षित होता. महाराजांच्या समाधीची दूरवस्था झाली होती. सन १८८३ साली जेम्स डग्लस नावाचा इंग्रज गृहस्थ शिवचरित्र वाचून महाराजांच्या जिज्ञासेपोटी गडावर गेला. रायगडच्या व महाराजांच्या समाधीच्या दूरवस्थेविषयी त्याने लिहून ठेवले. डग्लसचे हे वर्णन वाचून त्यावेळच्या भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. सन १८८५ मध्ये रावबहाद्दूर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इ. समाजधुरीणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन केले आणि त्यात समाधी जीर्णोद्धाराच्या कार्याचे सुतोवाच करण्यात आले.
मंडळाच्या स्थापनेची सभा
३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत मोठ्या सभेचे आयोजन केले होते. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचे आवाहन या सभेला केले गेले. त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ लोकमान्य टिळकांनी केसरीतून फंड उभारणीचे आवाहन केले. ज्युनिअर कुरुंदवाडाचे प्रमुख श्रीमंत बापूसाहेब पटवर्धन यांनी समाधीवर छत्री बांधण्याचा, नित्य पूजा करण्याचा व प्रतिवर्षी रायगडावर उत्सव सुरु करण्याचा ठराव मांडला. दाजी आबाजी खरे यांची अध्यक्ष म्हणून व लोकमान्य टिळकांची कोषाध्यक्ष, चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत २४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
(हेही वाचा राज ठाकरेंविरोधात नाॅनबेलेबल वाॅरंट जारी)
समाधी जीर्णोद्धारासाठी यशस्वी संघर्ष
रायगडचा ताबा ब्रिटीश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटीश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी १९०६ साली ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड यांचेकडे एक अर्ज दाखल केला व सुनावले की शिवाजीराजांच्या प्रती आम्हा सर्व प्रजेला सार्थ अभिमान आहे. राजांच्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. त्या राजाला शोभेल अशी स्मारकाची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे. पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ ला ब्रिटीश सरकारने १९ हजार ४३ रुपयाच्या खर्चास मान्यता दिली. यापैकी मंडळाने उभा देलेला १२ हजार रुपयांचा निधी ब्रिटीश सरकारचे ५ हजार रुपये व पुरातत्व खाते वेस्टर्न सर्कलच्या सुपरीटेंडने २ हजार ४०३ रुपयाचा निधी देण्याचे ठरवले. रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने आराखडा तयार करून कामाला सुरुवात झाली. आणि पुढील वर्षी सन १९२६ साली आज आपण पाहतो ती छत्रपती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू उभी राहिली. यासबंधीचा ब्रिटिशकालीन कागदोपत्री पुरावा आजही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडे उपलब्ध आहे, असे मंडळाने म्हटले आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या ४५ मिनिटांच्या भाषणाचा पोलिसांनी केला ५ तास अभ्यास
Join Our WhatsApp Community