भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी दरेकर म्हणाले, राऊतांचा दर्जा किती घसरला आहे, हे ते स्वतःच वारंवार दाखवत आहेत. संजय राऊत हे बाळासाहेबांचे काम विसरले आहेत. बाळासाहेबांकडून अल्टीमेटम दिला जात होता. मात्र आता संजय राऊत हे नुसतेच बोलतात. संजय राऊत कोण आहेत, त्यांचा जीव किती ते बोलतात किती असा खोचक टोला देखील दरेकरांनी लगावला आहे. दरम्यान, संजय राऊतांवर निशाणा साधताना त्यांनी त्यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, ते सर्व गोष्टी शांतपूर्ण करत असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणाले, “कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका!”)
दरेकरांनी केले राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत
राज ठाकरेंच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले असून राज ठाकरे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत. त्यांनी आज एक पाऊल मागे घेतले. मात्र याचा अर्थ राज ठाकरेंनी माघार घेतली, असे होत नाही. त्यांनी ४ पाऊले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले. आज सामनामधून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला दरेकरांनी अप्रत्यक्षपणे प्रतित्युत्तर दिले आहे.
औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी राज ठाकरेंवर कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला आहे. आता तोच राग ठाकरे सरकार बाहेर काढत आहे. त्यामुळेच पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
(हेही वाचा – … तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील, सरकारने तयार रहावे; मनसेचा इशारा)
राज ठाकरेंचे समर्थन करत सरकारवर टीकास्त्र
मंगळवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकार मनसैनिकांना संदेश देऊ पाहत आहे. आमच्याविरोधात बोललात तर कायद्याचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे दाबू, असे सरकार सुचवू पाहत आहे, असा आरोपदेखील प्रवीण दरेकरांनी केला आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांचे समर्थन करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडल्याने आता भाजप देखील राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मैदानात उतरल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community