आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्रास काय होतो ते त्यांनाही समजू दे- राज ठाकरे

141

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवार 3 मे रोजी संपत आहे. हे भोंगे उतरले नाहीत तर 4 मे पासून मनसेकडून राज्यभर मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येईल. राज ठाकरे यांच्यावर सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतरही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात येत होते.

(हेही वाचाः ‘या’ विधानांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पहा व्हिडिओ)

याच संदर्भात राज ठाकरे यांनी एक पत्र जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे, असे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. देशात आम्हाला दंगली नको आहेत. पण आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी या पत्रातून दिला आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या अटकेचा मनसेला ‘असा’ झाला होता फायदा)

काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात?

मशिदींवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.

(हेही वाचाः बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)

आमच्याकडून धर्मानंच उत्तर दिलं जाईल

सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानंच दिलं जाईल.

आम्हीही हट्ट सोडणार नाही

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

(हेही वाचाः राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?)

धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते?

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा. हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते?, असा सवालही राज ठाकरे यांनी या पत्रातून केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.