केंद्राच्या निर्णयाने रखडली कांदा निर्यात, मोदी-ठाकरे सरकार आमने सामने

231

केंद्र सरकारने कांदा उत्पादनावर निर्यात बंदी घातल्यामुळे आता केंद्र सरकार विरूद्ध ठाकरे सरकार असा वाद रंगला असून, केंद्राच्या भुमिकेवर महाविकास आघाडी सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. आधीच कोरोनामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे, तरीही शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. परंतु केंद्र सरकारने अचानक सोमवारी निर्यातबंदी जाहीर केल्याने हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकला आहे. त्यामुळे कांदा उत्पादनाच्या निर्यातबंदीवर फेरविचार करावा यासाठी आता ठाकरे सरकार केंद्राला पत्र पाठवणार आहे.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

केंद्राच्या निर्णयानंतर मनमाडमध्ये शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, लासलगावला शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा लासलगाव बाजार समितीत परिणाम दिसून आला आहे. कांद्याच्या भावात क्विंटल मागे १००० रुपयांची घसरण झाली आहे. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पाडण्यात आला आहे.

बच्चू कडूंचा ‘प्रहार’

कृषी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात छुप्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे. आता कुठे कांद्याला भाव मिळायला लागला होता. त्यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे. त्यामुळे निर्यातीसाठी निघालेले कांद्याचे कंटेनर सध्या थांबवण्यात आले आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या प्रश्नावर आता बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

कांदाप्रश्नी बैठक

दरम्यान, कांद्या प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे खासदार उपस्थित राहणार असून, बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे.

महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन

देशामध्ये २६ राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. देशातल्या एकूण कांदा उत्पादनापैकी ३० ते ४० टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खासकरून कांद्याचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. एका एकराच कांद्याचे पीक घेण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये इतका खर्च येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.