मुंबई महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठ्याचे नमुने तपासणाऱ्या तसेच खाद्य पदार्थांसह इतर वस्तूंच्या शुध्दतेची तपासणी करणाऱ्या महापालिका प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. जुनाट पध्दतीच्या या प्रयोगशाळेत फूड आणि वॉटर क्वॉलिटी मॉनिटरींग सिस्टीम बसवली जाणार आहे. महापालिका अद्ययावत करताना नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर या प्रयोगशाळेमध्ये प्रकल्प रावबून डेटा एन्ट्रीद्वारे सर्व नमुन्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘हा’ रेल्वेमार्ग करताना 24 हजार कामगारांनी गमावला हाेता जीव )
मुंबई महापालिकेची विश्लेषक प्रयोगशाळा जी उत्तर विभागात असून यामध्ये प्रामुख्याने अन्न व पाणी यांचे नमुने तपासले जातात. हॉटेल्समधील खाद्यपदार्थांचे नमुने आणि खासगी वसाहतीतील पाण्याचे नमुने शुल्क आकारुन तपासले जातात. परंतु आजवर मानवीय पध्दतीनेच हे काम केले जात असल्याने या प्रयोगशाळेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे यासाठी उपयुक्त असलेल्या सॉफ्टवेअर आधारीत यंत्रणा बसवण्यात येत असून यासाठी पुढील दहा वर्षांकरता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी सुमारे सव्वा चार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी याबाबत बोलतांना, वर्षभरात या प्रयोगशाळेद्वारे विविध प्रकारचे सुमारे ७० हजार पाण्याचे नमुने तपासले जातात. तसेच महापालिकेच्या विविध शाळांना पुरवण्यात येणाऱ्या खिचडीचे सुमारे ६ हजार नमुन्यांचीही तपासणी केली जाते. या नमुना तपासणी अहवाल संगणकावर टंकलिखित करण्यात येतो. परंतु आजवर सुरु असलेले हे काम मानवीय पध्दतीचे असल्याने नमुना नोंदणीपासून ते अहवाल देण्यापर्यंतच्या कामांमध्येही बराच वेळ जातो. त्यामुळे महापालिकेला वार्षिक व मासिक अहवालही वेळेत देण्यात अडथळा येत असल्याने ही प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community