राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. याप्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी राणा दाम्पत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली असून, मुंबई महापालिका खारच्या इमारतीत असलेल्या राणा दाम्प्त्याच्या घराची पाहणी करणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ कंत्राटदारावर उदार; कर्मचारी मात्र झालाय बेजार! )
मुंबई महापालिकेकडून नोटीस
प्रत्यक्ष घराच्या आराखड्यात छेडछाड करून अनधिकृत बांधकाम केल्याचा संशय महापालिकेला आहे. त्यामुळे महापालिकेने राणा दाम्पत्याला तपासणी नोटीस दिली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्याचे पती आमदार रवी राणा गेल्या १० दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या मुंबईतील खारच्या बंद घराबाहेर महापालिकेने ही नोटीस लावली आहे. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ४ मे रोजी या घराची तपासणी करण्यात येईल.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातल्या या अटी
प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत.
नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात दाखल
नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा आजार आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community