समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 35 लाख 92 हजार 921 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 215 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झालेला आहे.
मोफत गणवेशाची योजना लागू
शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील मुले, दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी मोफत गणवेशाची योजना लागू आहे. समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत निधी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
( हेही वाचा : जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान )
प्रती गणवेश 300 रुपये याप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रती विद्यार्थी 600 रुपये याप्रमाणे निधीची तरतूद मंजूर झालेली आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करावी लागणार आहे. केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावरुन मंजूर केलेली तरतूद खर्च करता येणार नाही, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community