गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. अशातच राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरून मनसेनं आंदोलन पुकारलेले असताना मुंबईतील मौलवींनी मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी मुंबईतील २६ मशिदींच्या धर्मगुरुची बैठक पार पडली रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर आता मुंबईतील मशिदीत पहाटेची अजान ही लाऊडस्पीकरविना करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
भोंग्याविनाच होणार अजान
मिळालेल्या माहितीनुसार, भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लिम धर्मगुरुंमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दुसरीकडे मुंबईतील झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी मुंबईतील मालाडू मालवणी येथील मशिदींमधून अजान देण्याबाबत मशिदींचे ट्रस्टी आणि मौलानांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मालाड, मालवणीतील जवळपास सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबई पाठोपाठ राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुस्लिम धर्मगुरुंनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सकाळची अजान ही भोंग्याविनाच करण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर नाही
बुधवारी ‘सुन्नी बडी मशिदी’मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यामध्ये भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.
तीसहून अधिक मशिदीत भोंग्यावर अजान होणार
रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनीही सामाजिक सलोख्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीत तीसहून अधिक मशिदींवर पहाटेची अजान भोंग्यावर होणार नाही, असे जाहीर केले आहे. रत्नागिरीत बुधवारपासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तर पहाटेनंतरच्या अजान सुद्धा कमी आवाजाच्या डेसीबलमध्ये केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर सर्व धर्मगुरुंना मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…)
Join Our WhatsApp Community