शिवतीर्थावर गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. याभूमिकेनंतर मनसे या पक्षातील काही मुस्लीम पदाधिकारी दुखावले आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पुण्यात शहराध्यक्ष आणि मनसे नेते असलेल्या वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर या भूमिकेविरोधात मत व्यक्त केले होते. त्यानंतर मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांना जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र मोरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, राज ठाकरेंच्या पुणे आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी देखील ते दिसले नाही. मात्र त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपण तिरूपती बालाजी येथे असल्याचे सांगितले आहे.
(हेही वाचा – मौलवींचा मोठा निर्णय! मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान)
वसंत मोरेंनी अखेर सोडले मौन
राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवण्याचे अल्टीमेटम दिले होते. त्यांनतरही भोंग्यांवरून अजान लावण्यात आली तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा, असा राज ठाकरेंनी आदेश दिला होता. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. या सर्व घडामोडीत पुण्यात मनसेचे वसंत मोरे कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाला होता. मात्र सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मोरेंनी अखेर मौन सोडले असल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यातही सहकार्य करू असं सांगितले. त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे आभार आहेत असं त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community