नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बुधवारी तरुणावर हल्ला झाला. हेमंत पाडवी (२८) या शेतमजूरावर बिबट्याने शेतीची कामे सुरु असताना हल्ला केला. या हल्ल्यातून हेमंत पाडवी थोडक्यात बचावले असला तरीही त्याच्या शरीरावर किमान दहा टाके पडले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आठवड्याभरातील बिबट्याचा दुसरा हल्ला आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडलं मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…”)
याआधी अक्कलकुवा तालुक्यातील दोन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन वर्षांची चिमुरडी थोडक्यात बचावली होती. सलग दोन घटनांनंतर आता वनविभागाने या भागांत कॅमेरा ट्रेप लावण्याचा निर्णय घेतला आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नाशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला
गुजरात आणि मध्यप्रदेशाला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांचा वावर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. बिबट्या गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही नंदूरबार जिल्ह्यात येत असल्याच्या वनविभागाकडे नोंदी आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ४ ते ५ बिबटे राहत असल्याचे याआगोदरच सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
बिबट्याच्या वावर आढळल्यास
० रात्रीच्यावेळी जंगलात किंवा बिबट्याचा वावर ज्या मानवी वस्तीत आढळून येत आहे, तिथे शक्यतो जाणे टाळावे.
० अपरिहार्य कारणामुळे सायंकाळनंतर घराबाहेर जायचे असल्यास मोठा आवाज करत किंवा मोबाईलवर मोठे गाणे लावत रस्त्यावर चालावे.
० रस्त्यावर चालताना हातात काठी जरुर ठेवावी
० कच-याची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरुन भटक्या कुत्र्यांचा वावर कमी होईल.
० रात्री रस्त्यावर दिवे लावून ठेवावेत.
० बिबट्या मानवी वस्तीजवळ आढळल्यास वावराबाबत १९२६ या वनविभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.