नवनीत राणांची जेलमधून सुटका, उपचारांसाठी ‘लिलावती’त दाखल

134

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा आज तब्बल १२ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. या दोघांचाही जामीन मंजूर झाला असून दोन्ही पक्षांकडून गुरूवारी ५०-५० हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात आले. दरम्यान, नवनीत राणांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र राणांनी केवळ हात जोडून त्यांचे आभार मानल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – “सरकार अल्टिमेटमवर नाही तर कायद्यावर चालतं”; अजित पवारांनी दरडावलं)

दरम्यान, बोरिवली न्यायालयाने बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर न्यायालयाकडून सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम भायखळा तर दुसरी टीम तळोजा तुरुंगाकडे रवाना झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. पण अद्याप रवी राणा यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु आहे. नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात तर रवी राणांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

 

मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटींसह जामीन मंजूर केला. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, राणा दाम्पत्याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नवनीत राणा याच्यावर १५३ अ चा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.