एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यात हल्ला; पोलिसांनी वाचवले प्राण

125

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यात हल्ला केला जात असताना, एका पोलीस शिपायाने हल्लेखोराच्या तावडीतून तिची सुटका करून प्राण वाचवले. या हल्ल्यात पोलीस शिपाईदेखील जखमी झाले असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र स्वतःच्या जीवावर खेळून हल्लेखोराच्या तावडीतून मुलीची सुटका करून तिचे प्राण वाचवल्यामुळे पोलीस शिपाई याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. वडाळा येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

असे पकडले हल्लेखोराला

मयूर बंडू पाटील असे तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मयूर पाटील हे बुधवारी सकाळी बरकत अली नाका वडाळा या ठिकाणी कर्तव्यावर होते. त्याच वेळी सकाळी एक तरुणी कामावर जाण्यासाठी बस स्थानकाच्या दिशेने जात असताना, एक इसम हातात धारदार शस्त्र घेऊन तरुणीच्या पाठीमागून येऊन तिच्यावर हल्ला करीत होता. हा प्रकार पोलीस शिपाई मयूर पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणीला वाचवण्यासाठी धाव घेतली असता, हल्लेखोराने पोलीस शिपाई पाटील यांच्यावरदेखील हल्ला केला. जखमी अवस्थेत देखील पाटील यांनी तरुणीचे प्राण वाचवत तिला स्थानिकांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात नेले. हल्लेखोराला पोलीस शिपाई पाटील यांनी ताब्यात घेऊन सहकारी पोलीस कर्मचारी यांच्या स्वाधीन केले.

( हेही वाचा मौलवींचा मोठा निर्णय! मुंबईतील ‘या’ २६ मशिदींमध्ये भोंग्याविना होणार पहाटेची अजान )

अन् असे वाचले तिचे प्राण

या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस शिपाई मयूर पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, वडाळा पोलिसांनी हल्लेखोर अनिल बाबर (३१) याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला अनिल बाबर हा जखमी तरुणीच्या ओळखीचा असून, तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करीत होता. तरुणीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्यामुळे, त्याने तिची हत्या करण्याच्या उद्देशातून तिच्यावर हल्ला करीत असताना पोलीस शिपाई पाटील यांनी तिचे प्राण वाचवले, अशी माहिती वडाळा पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.