विरारच्या काशिद गावात रानडुक्करांसाठी लावलेल्या फाश्यात अडकलेल्या बिबट्याला अपंगत्व आले. या बिबट्याला संसर्गापासून वाचवण्यासाठी जखमी झालेला डावा पाय पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढला. केवळ तीन पायांवर या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याऐवजी वनविभागाने त्याला कायमचे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात ठेवले आहे. उद्यानात शारिरीक अपंगत्वामुळे, लहानपणीच आईपासून अलिप्त झाल्याने, माणसावर हल्ला केल्याची शिक्षा अशा विविध कारणांमुळे १७ बिबट्यांना मरेपर्यंत तुरुंगवास मिळाला आहे. या बिबट्यांविषयी आणि बिबट्या पुनर्वसन केंद्राविषयीची ही माहिती…
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून अंदाजे अडीच किलोमीटर अंतरावर मेप्को फॅक्टरी परिसरात उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात १७ बिबटे राहतात. या बिबट्यांना राहायला मुक्त अंगण, बसण्यासाठी लाकडी टेबल, आतमधल्या पिंज-यातही बसायला छोटेखानी भिंतीला लागून असलेले टेबल अशी सोयीसुविधा उपल्बध करुन दिलेली आहे. पिंज-याच्या समोरच असलेल्या पंख्याची हवा घेत मे महिन्याच्या उकाड्यापासून लांब राहण्यचा या बिबट्यांचा दिनक्रम सध्या सुरु आहे.
मानवी हालचालींपासून दूर असलेल्या ३० बाय ३० मीटर जागेत बिबट्या पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. २०१५ साली जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बिबट्या पुनर्वसन केंद्र सुरु झाले. या अगोदर उद्यानातील लायन सफारी नजीकच्या पिंज-यातच हे बिबटे राहत होते. कालांतराने बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच नवे बिबट्या पुनर्वसन केंद्र उभारले गेले आहे.
नव्या बिबट्या पुनर्वसन केंद्राच्या एका दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे. उर्वरित तीन बाजूंना पिंज-यांची आणि पिंज-याला लागून बिबट्यांना खेळण्यासाठी मैदान उभारले गेले आहे. तीन विभागांत आठ पिंजरे उभारले गेले आहेत. मधल्या आणि उजव्या भागांत प्रत्येकी सहा बिबटे तर डाव्या विभागात चार बिबटे राहतात. इतक्या वर्षांच्या सहवासात त्यांची मैत्रीही बहरली आहे. काहींना एकाच पिंज-यात राहायला, एकत्र खेळायला आवडते.
बिबट्या पुनर्वसन केंद्राच्या डाव्याकडील भागांत सुरुवातीला भीम आणि अर्जून हे भावंड गुण्यागोविंदाने नांदायचे. कालातंराने भीम हा बिबट्याचे निधन झाले आणि अर्जून हा एकटा राहिला. १२ वर्षांच्या अर्जूनला शेजारच्या पिंज-यातील हेमा साद घालतेय. दोघेही बिबट्या पुनर्वसन केंद्रात आईपासून अलिप्त झाले तेव्हा आणले होते. भीमसह आलेला अर्जून केवळ ४ दिवसांचा होता तर हेमा दीड महिन्यांची होती. आता दोघेही वयस्कर झाले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार एकाच पिंज-यात नर-मादी राहू शकत नाही, त्यामुळे त्या दोघांमध्ये पिंज-याचा दुरावा आलाय. हेमा वयस्कर असली तर नजीकच्या पिंज-यातील नंदन आणि बिपीन या बछड्यांना फारशी जवळ करत नाहीत. हे दोन्ही भावंड नंदूरबारहून आणले गेले. आईपासून विभक्त झालेल्या या दोघांनाही अशक्तपणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. परंतु प्राणीरक्षकांच्या काळजीत आता दोघेही पिंज-यात आनंदाने बागडत आहेत. प्राणीरक्षकांच्या एका हाकेत ते पिंज-याजवळ पळून येतात. जणू काही तेच नंदन आणि बिपिनचे पालक बनलेत. या विभागात नाशिकहूनच एकामागोमाग एक आलेल्या करुणा आणि क्लिओ या दोन मादी बिबट्यांची मैत्री आता फुलू लागली आहे. दोघीही २०२० साली आईपासून अलिप्त झाल्याने दोन महिन्यांची करुणा आणि क्लिओ नाशिकहून आणल्या गेल्या. क्लिओ वनाधिका-यांनी प्रेमापोटी नाव ठेवले तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत आलेल्या बछडीला करुणा असे नाव मिळाले.
Join Our WhatsApp Community