मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या आठ तास ड्यूटीपाठोपाठ पोलीस अंमलदारांच्या ८ तास ड्युटीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांकडून याबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. दुसरीकडे ‘८ तास कर्तव्य’ पद्धतीला ६ वर्षे पूर्ण झाली म्हणून पोलिसांनी केक कापून त्याचे सेलिब्रेशन देखील करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना आठ तास कर्तव्य आणि १६ तास आरामाचे अशी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पुरुष अंमलदारांच्या कामाचे तासही आठ तास केला आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी अधिकृत पत्रक जारी करून ही माहिती दिली.
(हेही वाचा – दोन वर्षांनंतर केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी)
मुंबईच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा अधिक ताण असून कामाचे निश्चित असे तास नव्हते. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी ती १६ ते २४ तासांपर्यंत होते. त्यामुळे अन्य आस्थापनांप्रमाणेच मुंबई पोलिसांची ड्यूटी आठ करण्याच्या उपक्रमाचा प्रस्ताव देवनार पोलीस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले जात आहे.
संजय पांडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक असताना राज्यात महिला पोलिसांना आठ तास ड्यूटीचे आदेश जारी केले. पांडे यांनी पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीची भेट दिली. त्यापाठोपाठ मुंबई पोलीस दलातील अमलदारानादेखील ८ तास ड्युटी करण्याची मागणी वाढली. पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्य समिती नेमून याबाबतचा अहवाल आयुक्तांना दिल्यानंतर ८ तास कर्तव्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
कसं असणार नियोजन
आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मुंबई शहरात तसेच तास पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱ्या पोलीस अमलदारांना ८ तास कर्तव्य, १६ तास आराम देण्यात येणार आहे. तर, पोलीस ठाण्यापासून ५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या पोलीस अमलदारांना १२ तास कर्तव्य, २४ तास आराम देण्याचा पर्याय आहे. त्यांना साप्ताहिक रजा घेता येणार नाही तर पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज करणारे अमलदार हे सकाळची १० ते रात्री ८ वाजेपर्यंत १० तास काम करतील.