‘मविआ’ बहुजनांचं सरकार? तर आत्महत्या केलेले एसटी कर्मचारी बहुजन नव्हते का? पडळकरांचा सवाल

157

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर शुक्रवारी चांगलाच हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी गुरूवारी पुण्यातील सभेत महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचे सरकार असल्याचे म्हटले होते. त्यावरूनच पडळकरांनी राऊतांवर चांगला निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियात एका व्हिडिओच्या माध्यमातून संजय राऊतांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचे सरकार आहे, असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेत केला. कदाचित आम्हा बहुजनांना आपणपण आपल्या सारखेच शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का?

गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली, ते शेतकरी बहुजन नव्हते का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे एसी, एसटी, भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवले गेले, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आले होते, असे प्रश्न पडळकरांनी उपस्थित केले आहेत.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडले मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…”)

धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात घेतली नाही. हे तुमचं कोणतं बहुजन धोरणं होतं? सरकार स्थापनेवेळी तुम्ही प्रस्थापितांसोबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण न्यायालयाने सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या. बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवी पताका उतरवली. आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो, असा टोला पडळकरांनी मविआला लगावला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.