मंत्र्यांच्या नावाखाली पैसे उकळणारे महाभाग समाजात मोठ्या प्रमाणात वावरत आहेत. अमुक मंत्र्याचा पी.ए. आहे तमुक मंत्र्याचा नातलग आहे असे सांगून सामान्य जनतेला आमिष दाखवत पैसे उकळण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दादर पोलिसांनी अशाच एका भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याने चक्क ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगत बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले. दादर पोलीस ठाणे या भामट्याचा कसून शोध घेत आहेत.
मुलांना नोकरी लावण्यासाठी दिले लाखो रुपये
संदीप राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे. संदीप राऊत याने वरळी कोळीवाडा येथे राहणारे महेश काजवे यांच्या एका नातलग महिलेची भेट घेतली. तिला आपण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगत महाराष्ट्र विद्युत महामंडळामध्ये मुलांना नोकरीला लावतो असे सांगितले. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून दीड लाख रुपये घेत असल्याचे, संदीपने सांगितले. काजवे यांच्या नातलग महिलेने माझ्या मुलाला एमएसीबीमध्ये नितीन राऊतांचा पुतण्या नोकरी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश काजवे यांनी मुलगा आणि मुलीच्या नोकरीसाठी संदीप राऊत याला दीड लाख रुपये दिले. त्यानंतर नातलगाच्या मुलाचे काम करून देण्यासाठी आणखी ८ लाख रुपये असे एकूण ९ लाख ५० हजार रुपये आणि कागदपत्रे दिली.
संदीप राऊत याने पैसे घेऊन काजवे यांच्या मुलांना नोकरीवर रुजू होण्यासाठी पत्र दिले आणि मार्च महिन्यात तुमची मुले कामावर रुजू होतील असे सांगितले. त्यानंतर हे नियुक्ती पत्र घेऊन काजवे यांची मुले वांद्रे येथील एमएसीबीच्या मुख्य कार्यालयात गेली असता, येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना नियुक्ती पत्र बनावट असल्याचे सांगत, त्यांना तिथून जाण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच महेश काजवे यांनी संदीप राऊत याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला,मात्र तो होऊ शकला नाही. अखेर काजवे यांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. दादर पोलिसांनी संदीप राऊत नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता संदीप राऊत हा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या आहे की नाही याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community