अमर महल ते ट्रॉम्बे जलबोगदा प्रकल्प ‘या’ तारखेला होणार पूर्ण, महापालिकेचा दावा

141

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा प्रकल्प अंतर्गत, अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील ३.६ किलोमीटर खनन शुक्रवारी विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महानगरपालिका प्रशासनाला ठाम विश्वास

पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या काही भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी व भविष्यातील वाढीव पाणीपुरवठ्याचा विचार करुन, पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत हा एकूण सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असतानाही त्यावर मात करुन, या जलबोगद्याच्या कामात प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाईल, याचा महानगरपालिका प्रशासनाला ठाम विश्वास आहे.

(हेही वाचा – मान्सून यंदा १० दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज)

या जलबोगदा प्रकल्प अंतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर. सी. एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र (भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर) येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.

जलबोगदा खोदकामाचा शुभारंभ २०२१ रोजी झाला

बोगद्याच्या खोदकामासाठी, हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदा खनन यंत्र (टीबीएम) उतरविण्यात आले आहे. या यंत्राच्या सहाय्याने जलबोगदा खोदकामाचा शुभारंभ ०६ मार्च २०२१ रोजी झाला होता. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. त्याचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या बोगद्याच्या खोदकामात अनेक भूगर्भीय अडचणी आलेल्या असताना देखील जानेवारी २०२२ या महिन्यात विक्रमी ६५३ मीटर खनन करण्यात आले होते. त्याचवेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरीही एकाच आठवड्यात दोनवेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली होती. या प्रकल्पाच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार मेसर्स टाटा कन्सल्टींग इंजिनियर्स लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार व मेसर्स पटेल इंजिनियरिंग लिमिटेड यांची कंत्राटदार म्हणून महानगरपालिकेतर्फे नेमणूक करण्यात आलेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.