दक्षिण अंदमान आणि नजीकच्या बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाचे दोन दिवसांत वादळात रुपांतर होत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळ तयार झाल्यानंतर १० मे रोजी आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर सरकेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओडिशा किनारपट्टीवर वादळासारखी परिस्थिती किंवा त्या भूभागातील वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास राज्यातील बहुतांश भागांत पाऊस पडतो. १० मे च्या दरम्यान राज्यात आता मॉन्सूनपूर्व पाऊस होईल की नाही, याबाबत वेधशाळेने ‘वेट एण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे.
( हेही वाचा : रेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली )
राज्यातील हवामानावर परिणाम
शुक्रवारी दुपारी जाहीर केलेल्या अंदाजपत्रात राज्यात १० मे पर्यंत मॉन्सूपूर्व पावसाची शक्यता नाही. उलट अजून चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटांचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटांमध्येच सुरु झालेल्या मे महिन्यात विदर्भवासीयांना अजून चार दिवस झेलावे लागणार आहेत. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रातही काहीली काहीशी कमी झाली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सायंकाळी गेले दोन दिवस झालेल्या पावसाने या भागांत काहीलीला ब्रेक दिला आहे. आता चार दिवसांत वादळ तयार झाल्यानंतर त्याची नेमकी कोणत्या दिशेने आगेकूच होतेय, त्यावर राज्यातील हवामानावर परिणाम दिसून येईल.
Join Our WhatsApp Community