१४ मे रोजी सभा घेत आहे. त्यावेळी नुसतेच वाद निर्माण करणार नाही, माझ्या मनात जे आहे ते बोलणार आहे. माझं काही तुंबलेले नाही, पण मनात ज्या गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना सुनावले.
अच्छे दिन येतच नाही!
आम्ही खोटी आश्वासने देत नाही. अच्छे दिन आयेंगे म्हणायचे आणि अच्छे दिन येतच नाही. कोणतीही थाप मारली तरी ती दररोज चालत नाही, एक ना एक दिवस लोक शहाणे होतात आणि थापा ओळखतात. जनतेनेही थापांवर विश्वास ठेवता कामा नये, जर आपण जनतेला काही तरी आश्वासन देतो, तेव्हा जनता एक मत देऊन स्वतःचे आयुष्य आमच्याकडे सोपवत असता. मतदान मशीनचे बटण दाबणे इतकेच त्या मताची किंमत नाही. जनतेला नोकरी, पाणी कोण देणार हे पहायचे असते. मतदार त्यांचे आयुष्य मताच्या रूपाने आमच्याकडे सोपवत असतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा शिवसेना म्हणते उध्दवजींनी केला भोंग्याचा करेक्ट कार्यक्रम)
कौतुक करण्याची दिलदारी विरोधी पक्षात नाही
एकतर लोकांना काम करू द्यायचे नाही आणि काम केले तर भ्रष्टाचार झाला म्हणून बोंबलत सुटत राहायचे. म्हणजे तुम्ही सगळे गंगेत स्नान करून शुचिर्भूत झाले आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी आहे, हा जो काय आव आणला जात आहे, हे भयानक आहे. राजकारण जरूर करा, पण त्यातही दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नाही, तुमच्याकडून चांगल्या सूचना आल्या पाहिजेत आणि जर सरकार चुकत असेल, तर त्यांचे जरूर कान उपटा. पण सरकार चांगले काम करत असेल तर कौतुक करण्याची दिलदारी पाहिजे जी आजच्या विरोधी पक्षात नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.