संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून अंदाजे अडीच किलोमीटर अंतरावर मेप्को फॅक्टरी परिसरात उद्यानातील बिबट्या पुनर्वसन केंद्रात १७ बिबटे राहतात. या बिबट्यांना राहायला मुक्त अंगण, बसण्यासाठी लाकडी टेबल, आतमधल्या पिंज-यातही बसायला छोटेखानी भिंतीला लागून असलेले टेबल अशी सुविधा आहे. पिंज-याच्या समोरच असलेल्या पंख्याची हवा घेत मे महिन्याच्या उकाड्यापासून लांब राहण्यचा दिनक्रम या बिबट्यांचा सध्या सुरु आहे.
डोळ्यांत तेल घालून करायला लागतो पहारा
बिबट्या पुनर्वसन केंद्रातील उजव्या आणि मधल्या विभागात बिबट्यांची संख्या ही प्रामुख्याने आईपासून दूरावलेल्या बछड्यांची दिसून येते. आरेतील गेल्या वर्षांच्या अखेरीस सापडलेली आर्या (सी ३२) ही दोन वर्षांची मादी बिबट्या मधल्या विभागात ठेवली गेलेली आहे. तिला सोडून फारसे कोणी चिडखोर प्रवृत्तीचे नाही. मात्र डाव्या विभागातील पिंज-यात फेरफटका मारताना डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते.
माणसांवर हल्ले करणा-या बिबट्यांची संख्या जास्त
डाव्या आणि शेवटच्या विभागांत माणसांवर हल्ले करणा-या बिबट्यांची संख्या जास्त आहे. या विभागांत ५ बिबटे राहतात. सुरुवातीला डाव्या भागातच ऐन कोरोनाकाळात दोन बिबटे आले. दोघांनाही नाशिकमधील वनाधिका-यांनी महिन्याभराच्या अंतराने पकडले. एकाला श्रावण (९) तर दुस-याला गणेश (१३) असे नाव दिले गेले. दोघेही जंगलातच लहानाचे मोठे झाले, आईच्या सहवासात शिकार शिकले. त्यामुळे दोघांच्या स्वभावातही आक्रमकता आहे. माणसांवर हल्ला केल्याची शिक्षा म्हणून दोघेही आता कायमचे अनाथालयात राहत आहेत. सुरुवातीला पिंज-यात बंद केल्याचा राग मनात धरत गणेशने पिंज-यालाही जोरात दणका दिला, या प्रयत्नाच्या काही खूणा त्याच्या नाकावरही दिसतात.
(हेही वाचा – मुंबईतील ‘हा’ उड्डाणपूल १२ दिवस वाहतुकीसाठी पूर्णत: बंद!)
याच काळात नाशिकमध्ये माणसांवर हल्ले केलेल्या वर्षभराचा सनीदेखील बिबट्यांच्या अनाथालयात दाखल झाला. आठ वर्षांपासून बिबट्या अनाथालयात राहणारा धुळे हा बिबट्या आता दहा वर्षांचा झाला आहे. धुळ्यात म्हाता-या महिलेवर हल्ला करणारा दोन वर्षांचा तेव्हाचा बिबट्या धुळे या नावानेच पुढे प्रसिद्ध झाला. त्याचे सुरुवातीचे अनाथालयातील दिवस फारच अवघड गेले. नव्या वातावरणात समरस होताना त्याच्याकडून प्रतिसाद मिळायचा नाही. अशीच काहीशी सुरुवात आरेत २०१७ साली चार ते पाच माणसांवर हल्ले करणा-या ११ वर्षांच्या रेग्युलसची. आरेतील माणसांवर या बिबट्याचे हल्ले वाढले होते. त्यातच आरेतील माणसांना जाण्यासाठी निषिद्ध असलेल्या हेलिपॅडच्या जागेतून उद्यानात काम करणारे निलेश गरुडा आपल्या मुलासह जात होते. सायंकाळच्या वेळेस गरुडा यांच्या मुलावरच रेग्युलसने हल्ला केला. रेग्युलसला पकडल्यानंतर शांत होण्यासाठी बराच काळ गेला. मात्र त्याच्या स्वभावाची कल्पना येणे काहीसे अवघडच असल्याची कबुली प्राणीरक्षक देतात.
वजनावरही नियंत्रण
प्रत्येक बिबट्याला दुपारी अडीच किलो मांस दिले जाते. प्रत्येक गुरुवारी एक दिवस उपवास ठेवला जातो. रोजच्या प्रहारात प्रत्येक बिबट्याची पूरेशी हालचाल होत व्यायाम होईल, याकडे आमचे लक्ष असते. बिबट्याचे वजन जास्त वाढल्याचे दिसून आल्यास, मांसाची मात्रा वजन नियंत्रणात येईपर्यंत कमी केली जाते, अशी माहिती बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र व सिंह सफारीचे अधीक्षक विजय बारब्दे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community