गेल्या आठवड्यात गडचिरोलीतील वळसा या जंगलात प्रेमीयुगुलावर हल्ला करणा-या तीन वर्षांच्या वाघाने आपला मुक्काम सध्या दुसरीकडेच वळवला आहे. हल्ल्याच्या दिवसानंतर वाघ वळसा जंगलात दिसत नसल्याची माहिती गडचिरोली वनविभागाने दिली. मात्र त्याची शोधमोहिम सुरु असून, बेशुद्ध करुन जेरबंद केले जाईल, अशी माहिती गडचिरोली (प्रादेशिक) साहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी दिली. या वाघाला ‘सीटी१’ असे संबोधले जात आहे.
हल्लखोर वाघाचे वय पाहता आपला स्वतंत्र भूभाग शोधण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु नजीकच्या भागांत अगोदरपासूनच राहणा-या वाघांमुळे तीन वर्षांच्या वाघाला त्याची हक्काची जागा मिळत नसल्याची माहिती गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांना दिली. तीन वर्षांच्या वाघाला स्वतःच्या हक्काचा प्रदेश लागतो. या प्रदेशात दुसरा वाघ राहू शकत नाही. वाघाच्या प्रदेशात दोन वाघीण आणि बछडे राहू शकतात. मात्र त्यांच्याव्यतिरिक्त कोणालाही थारा मिळत नाही. त्यामुळे या वाघाची धडपड सुरु असल्याची माहिती उमरे यांनी दिली. आतापर्यंत वाघाचा हल्ला जंगलभागात झाला आहे. माणसे जंगलात वाघाचा वावर असतानाही जात असल्याने, होणा-या जीवितहानीला वाघाला दोष देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
सीटी१ नक्की आला कुठून?
सीटी१ या वाघाने गेल्या वर्षीच्या अखेरीस ताडोबा येथील चिमूर येथे पहिला माणसावर हल्ला केला. त्यावेळी हा वाघ सर्वांच्या नजरेस आला. चिमूर येथे दिसल्याने त्याला सीटी१ असे संबोधले जात आहे. मात्र हा वाघ ताडोबातील वाघ नसल्याची माहिती ताडोबा व्याघ्र वनविभागाने दिली. ताडोबाच्या नजीकच्या बफर झोनमध्ये काही वाघ आहेत. ताडोबात वाढती वाघांची संख्या लक्षात घेत, काही वाघ बफरझोनमध्ये बछडे जन्माला घालत आहेत. त्यांची नोंद झाली नसल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली.
सीटी१ने काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीतील एका वाघाला मारले होते. वळसा येथील प्रेमीयुगुलावर जो हल्ला झाला होता त्या जंगलात एका वाघाचा भूभाग आहे. याव्यतिरिक्त एक वाघीण आपल्या चार बछड्यांसह राहते. वळसा जंगलात राहणारा वाघ नजीकच्या २५ किलोमीटर भागांत काही दिवस राहतो. कदाचित त्यामुळे इतके दिवस सीटी१ला येथे रहाणे शक्य झाले, असा अंदाज गडचिरोली वनविभाग (प्रादेशिक)चे साहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी व्यक्त केला.