बंगालच्या उपसागरात घोंगावणा-या ‘असानी’ या तीव्र चक्रीवादळाच्याबाबत भारतीय वेधशाळेने खुशखबर दिली आहे. हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला धडकणार नसल्याची माहिती भारतीय वेधशाळेचे उपमहासंचालक डॉ एम मोहापात्रा यांनी दिली. उद्या १० मे रोजी मंगळवारी रात्री आंध्रप्रदेश किनारपट्टीचा उत्तरेकडील भाग आणि ओडिशा किनारपट्टीला जवळून स्पर्श करत वादळ पुन्हा बंगालच्या उपसागरात परतेल, असे भारतीय हवामान खात्याकडून आज, सोमवारी जाहीर करण्यात आले. सध्या हे वादळ बंगालच्या उपसागच्या मध्य भागांतून आंध्रप्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीला लागून असलेल्या भागाकडे १२५ किलोमीटर ताशी वेगाने पुढे सरकत आहे.
(हेही वाचा – …म्हणून बंगालच्या उपसागरातील वादळाला पडलं ‘असानी’ नाव!)
भारतीय वेधशाळेची वेट एण्ड वॉचची भूमिका!
‘असानी’ या बंगालच्या उपसागरात तयार होणा-या वादळाबाबत तीन दिवसांपूर्वीच भारतीय हवामान खात्याने पूर्वकल्पना दिली होती. रविवारी असानी चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढत असल्याचेही भारतीय हवामान खात्याने सांगितले. मात्र वादळ आंध्रप्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या मध्ये नेमके कुठे धडकतेय, याबाबत भारतीय हवामान खात्याने सुरुवातीपासूनच तपशीलवार माहिती देणे टाळले. याबाबतीत भारतीय वेधशाळेची वेट एण्ड वॉचची भूमिका होती.
आम्ही दर तीन तासांनी ‘असानी’ तीव्र चक्रीवादळाची माहिती देत राहू. सध्या असानी तीव्र चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार नसल्याचे दिसून येत आहे. पण वादळाच्या प्रत्येक हालचालींवर आमचे बारकाईने लक्ष आहे
– (डॉ एम मोहापात्रा, भारतीय हवामान खात्याचे महासंचालक )
सोमवारी रात्री वादळ १० मेदरम्यान बंगालच्या उपसागरात मागे सरकत असल्याची कल्पना भारतीय वेधशाळेने दिली. मात्र असानी तीव्र चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार नसून, १० ते १२ मे दरम्यान दोन्ही किनारपट्टीवरुन खूप जवळून सरकणार असल्याची माहिती दिली गेली. १० मे संध्याकाळपासून आंध्रप्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि ओडिशा किनारपट्टीवरील बहुतांश भांगात दोन दिवस मुसळधार पाऊस होईल. १२ मे दरम्यान पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल.
‘असानी’ वादळामुळे पावसाचा अंदाज
आसाम, मेघालय, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा आणि तामिळनाडू या राज्यात विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पूर्वमोसमी मुसळधार पावसाला सोमवारपासून सुरुवात होईल. यावेळी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.