मुंबईची जीवनवाहिनी, लोकल ट्रेन म्हणजे अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. प्रत्येकाच्या आठवणी तिच्याशी जोडलेल्या असतात. मुंबई बाहेरील लोकांना या लोकलचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. तसेच ही रेल्वे ज्या स्थानकांवरुन जाते त्यांची नावंही मुंबईबाहेर कुतुहलाचा विषय असतात. या स्थानकांच्या नावांमागचा इतिहासही तितकाच रंजक आहे. मुंबईतील स्थानकांना नावे कशी दिली गेली किंवा वापरात आली ते पाहूया.
घाटकोपर
या परिसरात असणा-या लहान टेकड्यांमुळे याला घाटकोपर हे नाव पडले. मराठीत घाट म्हणजे डोंगर आणि घाट के उपरचा अपभ्रंश होऊन घाटकोपर हे नाव दिले गेले.
सीएसएमटी
आधी या स्थानकाचे नाव बोरीबंदर असे होते. नंतर राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा सुवर्णमहोत्सव चालू असताना, तिच्या सन्मानार्थ याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस अर्थात व्हिटी असे करण्यात आले. 1996 साली स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे केले गेले. त्यानंतर २०१७ मध्ये या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्यात आले.
चर्चगेट
सेंट्रल लाईनवर जसे सीएसएमटी हे महत्वाचे स्थानक आहे तसे वेस्टर्न लाईनवर चर्चगेट आहे. फ्लोरा फाऊंटनजवळ सेंट थाॅमस कॅथड्रल नावाचे एक चर्च होते. या चर्चवरुन या स्थानकाचे नाव चर्चगेट असे ठेवण्यात आले.
करी रोड
सी. करी यांच्या नावावरुन या स्थानकाचे नाव करी रोड असे ठेवण्यात आले. 1865 ते 1875 या कालखंडात त्यांनी जीआयपी, बीबीसीआय या रेल्वे कंपन्यांच्या देखभालीचे काम सांभाळले. त्यांच्या नावावरुन हे रेल्वेस्थानक करी रोड या नावाने ओळखले जाऊ लागले.
दादर
दादरचे महत्त्व म्हणजे मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे हे स्थानक आहे. माहिम आणि परळ यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. मराठीत दादर म्हणजे पाय-या या पुलाच्या पाय-यांवरुन दादर नाव दिल्याचे सांगितले जाते.
भायखळा
याठिकाणी धान्याची कोठारे अर्थात खळी मोठ्या प्रमाणात होती आणि यांचा मालक भाय नावाची व्यक्ती होती त्यावरुन या भागाला भायखळा नावे दिले गेले.
ग्रॅण्ट रोड
हा परिसर पूर्वी अत्यंत ओसाड होता. इथे पक्क्या सडका बांधून हा भाग गिरगावला जोडण्यात आला आणि हे काम मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर राॅबर्ट ग्रॅण्ट यांनी केले. त्यांच्या स्मरणार्थ या परिसराला ग्रॅण्ट रोड हे नाव देण्यात आले.
( हेही वाचा: टायटॅनिक जहाज कसं बुडालं? वाचा टायटॅनिकची खरीखुरी स्टोरी… )
कुर्ला
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणा-या खेकड्याचा एका प्रकार कुर्ल्यावरुन या परिसराला कुर्ला हे नाव मिळाले.
विलेपार्ले
विले पावडे या पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश होत पावडेचे पार्ले झाले. विले म्हणजे वसाहत आणि पावडे म्हणजे झोपडी. इथल्या वसाहतींना विले पावडे या कारणासाठीच म्हटले जात असे.
Join Our WhatsApp Community