ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. कोर्टाने आरक्षण न देताच निवडणुका घेण्याचं जाहीर केलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यातच निवडणुकांआधी राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने राजकीय नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसेची पुढची रणनिती काय असणार?
राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणावरून रान उठवलं आहे. ठाकरेंनी मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबादमध्ये सभा घेतली. यादरम्यान त्यांनी दोन वेळा पुण्यात बैठकी घेतल्या. यामुळे राजकीय वातावरण गरम झालं आहे. त्यातच आता पुण्यात रविवारी १५ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या राजकीय वाद-विवादानंतर मनसेची पुढची रणनिती काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी!)
बाळा नांदगावकर देखील उपस्थित राहणार
औरंगाबादच्या सभेनंतरही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुणे दौरा केला. त्यानंतर आता मनसेच्या गोटातून आणखी एक माहिती समोर येत आहे. शहर स्तरावर पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. साईनाथ बाबर शहर अध्यक्ष झाल्यानंतर मनसेचा पहिलाच जाहीर मेळावा होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनिती ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे शहरातील मनसे नेते, पदाधिकारी, शाखा अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्ते मेळाव्यात उपस्थित राहतील. मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community