अजब प्रकरण! लग्नाच्या 6 वर्षांनंतरही नातवंड नाही, म्हणून मुलगा आणि सुनेविरुद्ध आई-वडिलांनी घेतली थेट न्यायालयात धाव

233

मुलं जन्माला घालत नसल्याने मुलगा आणि सुनेला वृद्ध दाम्पत्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वर्षभरामध्ये मुलं जन्माला घाला अन्यथा 5 कोटी रुपये द्या, अशी अट आई-वडिलांनी आपल्या मुलाला घातली आहे. हरिद्वारमधील वृद्ध दाम्पत्याने आपला मुलगा आणि सुनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

हरिद्वारमधील एका वृद्ध दाम्पत्याची त्यांच्या पालयट मुलगा आणि सुने विरोधात तक्रार आहे की, लग्नाला 6 वर्षे उलटूनही नातवंड नाही. त्यामुळे या वर्षात जर नातवंड जन्माला घातलं नाही, तर 5 कोटी रुपये द्या, अशी कायदेशीर नोटीस या वृद्ध दाम्पत्याने आपल्या मुलाला आणि सुनेला पाठवली आहे.

देशातील अशी ही एकमेव केस

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे राहणारे एस. आर. प्रसाद आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलाला आणि सुनेलाच न्यायालयात खेचले आहे. 2016 साली या दाम्पत्याच्या मुलाचे लग्न झाले आणि त्यांचा संसार सुरु झाला. 6 वर्षे उलटूनही नातवंड नसल्याने, कायदेशीर नोटीस पाठवत असल्याचे, या दाम्पत्याचे म्हणणे आहे. या दाम्पत्याच्या वकिलांचे असे म्हणणे आहे की या दाम्पत्याने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी बरेचसे पैसे खर्च केले, त्याला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले, तसेच घरासाठी कर्ज काढलं आणि आता उतार वयात आम्हाला मानसिक एकाकीपणा आला आहे आणि तो दूर करण्यासाठी आम्हाला नातवंड हवं आहे.

( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

…म्हणून 5 कोटींची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचा पायलट मुलगा गुवाहाटी येथे राहतो आणि सून नोएडा येथे काम करते. या जोडप्याचे वकील अरविंद श्रीवास्तव यांनी सांगितले की, मागितलेल्या 5 कोटी रुपयांमध्ये त्यांच्या मुलाचे पंचतारांकित हॉटेलमधील लग्न 60 लाख रुपयांची आलिशान कार आणि परदेशात त्यांच्या हनीमूनवर खर्च करण्यात आला होता, त्यात याचा समावेश आहे.

न्यायालय काय निर्णय देणार?

हरिद्वार येथील स्थानिक न्यायालयाने शनिवारी ही याचिका स्वीकारली असून, त्यावर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण अशाप्रकारे केवळ वंशसातत्य टिकवण्यासाठी कोणी न्यायालयात धाव घेऊ शकत का ? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालय या सर्व प्रकारावर काय वक्तव्य करतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.