महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील वाद आता पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तिघे एकत्र असलो तरच बहुमताचा आकडा पार करता येतो, हे सर्वांनी लक्षात घ्यावं असे विधान अजित पवार यांनी केले आहे.
(हेही वाचाः मैत्री करायची तर प्रामाणिकपणे करा, काँग्रेसचा राष्ट्रवादीला थेट इशारा! पटोलेंच्या ट्वीटमुळे खळबळ)
प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले हे विधान हास्यास्पद आहे. मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना त्याचा वेडावाकडा अर्थ निघणार नाही, याची काळजी घ्यावी. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. आताची परिस्थिती बघता तिघे एकत्र असलो तरच बहुमताचा आकडा पार करता येतो आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामे करता येतात. या गोष्टीची नोंद सर्वांनी घ्यावी, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
झाकली मूठ सव्वा लाखाची
राष्ट्रवादीने आपले काही नगरसेवक फोडल्याचे पटोले यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेतले आहे. नाना पटोले हे स्वतः आधी काँग्रसेध्ये होते, तिथून ते भाजपमध्ये गेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे प्रत्येकाने आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.
(हेही वाचाः महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही – जयंत पाटील)
जिल्हा पातळीवर मुभा
भंडारा गोंदियामध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने भाजपशी युती केल्याचा आरोपही पटोले यांनी केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांची मध्ये बैठक घेतली तेव्हा त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची आहे. पण जिल्ह्याच्या स्तरावर काही वेगळे प्रश्न असतील तर तिथले राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार खासदार यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community