देशाच्या संसदेतील सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 24 मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबतच्या सूचना देण्यात येतील, असेही सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील 6 जागांसाठी निवडणुका
देशातील एकूण 15 राज्यांतील 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ जून-ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी 10 जून रोजी नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील 19 पैकी एकूण सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपत आहे. तर भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांच्या जागांसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे.
31 मे पर्यंत अर्ज भरण्याची वेळ
24 मे रोजी या निवडणुकांबाबत सूचना देण्यात येणार असून, 31 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर 3 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. 10 जून रोजी या निवडणूका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या कर्नाटकातील राज्यसभेच्या जागेसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे.
Join Our WhatsApp Community