सिंधुदुर्गात हत्तींचा धुमाकूळ… बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

136

दोडामार्ग तालुक्यातील मोर्लेमधून केर गावामध्ये परतलेल्या हतींच्या कळपाचा मुक्काम केर गावातील जंगल परिसरात आहे. १२ मे रोजी सकाळी हे हत्ती केर भागात असल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांच्या मुक्कामात हत्तींनी वस्तीलगतच्या फणसांवर ताव मारला आणि शेतकऱ्यांच्या माड व बांबुंचे नुकसानही केले. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मागणी ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.

( हेही वाचा : सिंधुदुर्गात हत्तींची भटकंती )

केर गावामधून मोर्लेत गेलेला हत्तींचा कळप मंगळवारी पुन्हा मोर्लेतून केरमध्ये पोचला. त्यांच्या भ्रमंतीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. पाच हत्तींच्या कळपात टस्कर हत्ती, एक मादी तर तीन पिल्ले आहेत. उन्हाळ्यात अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात जातात त्यामुळे यांनाही या हत्तींचे दर्शन घडते.

ग्रामस्थांची मागणी

केर, मोर्ले, सोनावल, पाळये, घोटगेवाडी, मेढे या गावात हत्तींची भटकंती सुरू आहे. परंतु हे हत्ती फार वेळ एका गावात थांबत नाहीत असा २००२ पासूनचा अनुभव गावकऱ्यांना आणि वनविभागाला आहे. हत्तींचा सर्वाधिक मुक्काम तिलारी धरणाच्या बुडित क्षेत्रात आणि घाटीवडे, बांबर्डे भागात असतो. त्यांना त्या भागात पाणी आणि खाद्य मोठ्या प्रमाणावर मिळते. केळीच्या बागा, फणस यासाठी हत्तींची गावोगावी भटकंती सुरु आहे. जिथे खाद्य मुबलक तिथे कळप स्थिरावतो, नाहीतर पुढच्या गावी निघून जातो. त्यांच्या प्रवासादरम्यान अनेकांना त्यांचे दर्शन घडते. अनेकजण या हत्तींचे फोटो आणि व्हिडिओही काढतात. परंतु सध्या या हत्तींनी शेतीचे नुकसान केल्यामुळे, तसेच हत्ती हल्ला करतील या भितीने काजूबागेत एकट्याने जाण्यासही गावकरी धास्तावले आहेत. या वन्य हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी मोर्ले ग्रामस्थ संतोष व राजन मोर्ये यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.