मेक्सिकोत कृषीक्रांती घडवणार्‍या ‘ह्या’ सशस्त्र क्रांतिकारकाला भारताने केलं दुर्लक्षित

161

देशासाठी सर्वोच्च त्याग करणारे अनेक चेहरे विस्मृतीत गेले आहेत. महाराष्ट्र भूमीची पुण्याई पाहा, इथे कित्येक वीरात्मे जन्माला आले. ही भूमी खरंच पुण्यभूमी आहे. विस्मृतीत गेलेल्या या महान विभूतींमध्ये पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव प्रथम श्रेणीत घेतलं पाहिजे. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नाव काहींनी ऐकलंही नसेल, काहींनी तर अगदीच पुसटसं ऐकलं असेल. ते कुणीतरी क्रांतिकारक होते इतकंच आजच्या पिढीला माहिती आहे.

कोण होते पांडुरंग सदाशिव खानखोजे?

पांडुरंग सदाशिव खानखोजे हे सशस्त्र क्रांतिकारक होते आणि कृषी संशोधकही होते. भारताने मात्र त्यांची फारशी दखल घेतली नाही. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ रोजी वर्धा येथील पालकवाडी या क्षेत्रात झाला. वर्ध्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांचे वडिल सरकारी नोकरीत होते. पिटिशन रायटर म्हणजे न्यायखात्यात अर्ज लिहिण्याचं काम ते करायचे.

आजोबा मात्र देशभक्त. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात ज्या वीरांनी बलीदान दिलं, त्या वीरांची स्मृरी आजोबा आपल्या मनात जागवून ठेवत. कारण तेही या चळवळीत सहभागी झाले होते. आजोबांकडूनच क्रांतिकार्याचे संस्कार बाल पांडुरंगावर झाले असावे.

लहानपणापासून क्रांतिकार्यात उडी

घरातंच आजोबांच्या रुपाने क्रांतिकार्याचा वारसा त्यांना मिळाला होता. लहानपणी तर एकदा ते भिल्ल सेना उभी करण्यासाठी जंगलात निघून गेले होते. त्यांना ब्रिटिशांविरोधात मोहिम उभी करायची होती. पण पोलिसांनी पकडून पुन्हा घरी आणलं. त्यामुळे बाल पांडुरंगाची बाल भिल्ल सेना काही उभी राहू शकली नाही. भविष्यात मात्र त्यांनी इंग्रजी सत्तेला गदागदा हलवलं.

त्यांच्या मनावर लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी मित्रांच्या मदतीने स्वदेशी वस्तूंचे दुकान उघडले होते. प्लेग दरम्यान इंग्रजांचे अत्याचार पाहून त्यांच्या मनात इंग्रजांविषयी असलेला राग अधिकच वाढला. ही सत्ता उलथवून फेकून द्यायची असा निश्चय त्यांनी केला.

घरच्यांनी लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पण ब्राह्मणाने शुभ मंगल सावधान म्हणायच्या आधीच त्यांनी घर सोडलं. पुढे ते अनेक सशत्र क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. लोकमान्य टिळकांचीही त्यांनी भेट घेतली.

स्वदेशातून विदेशाकडे

लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन त्यांनी ठरवलं की आता देशातून स्वातंत्र्य चळवळ उभी करण्यापेक्षा विदेशात जाऊन इंग्रजी सत्तेविरुद्ध मोठं आव्हान उभं करायचं. या हेतूने ते जपानमध्ये गेले. जपानी सैन्याने सोव्हियत युनियनच्या सैन्याचा पराभव केला होता. या युद्धकौशल्याचा त्यांनी अभ्यास केला.

पुढे ते चीनमध्ये गेले. त्यांनी चीनच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. अनेक क्रांतिकारकांना ते भेटले. या दरम्यान सेन फ्रान्सिस्को या शहरात भूकंप झाला आणि होत्याचे नव्हते झाले. ते सेन फान्सिस्कोमध्ये पोहोचले खरे. मात्र तिथे त्यांची दयनीय अवस्था झाली. अमेरिकेत ते आपल्या मित्रासोबत राहत होते. काही काम नव्हतं म्हणून त्यांनी हॉटेलची भांडी घासली, कम्पाऊंडर म्हणूनही काम केलंय. विचार करा एवढा बुद्धिमान माणूस, महान क्रांतिकारक आणि कृशास्त्रतज्ञाला भांडी घासताना कसलीच लाज वाटली नाही. त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं, भारतदेशाचे स्वातंत्र्य आणि समृद्धी.

क्रांतिकार्य आणि कृषीकार्य

एकीकडे त्यांचं क्रांतिकार्य सुरुच होतं. पोटासाठी थोडे फार पैसे कमावताना त्यांनी स्फोटकांचं प्रशिक्षण घेतलं. त्याच दरम्यान कृषी महाविद्यालयात प्रवेश देखील मिळवला. इतकेच काय तर त्यांना पदव्याही मिळाल्या. पुढे तर त्यांनी लष्करी महाविद्यालयातही प्रवेश मिळवला. पण ब्रिटिश गुप्तहेरांची टांगती तलवार त्यांच्यावर होतीच.

पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला. त्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. यासाठी त्यांनी गव्हावर संशोधन केलं होतं. एकीकडे कृषीचं शिक्षण तर दुसरीकडे हत्यारे चालवण्याचं शिक्षण अशी दुहेरी भूमिका ते निभावत होते. मग त्यांनी अमेरिकेत त्यांनी सहकर्‍यांसोबत इंडियन इंडिपेंडेंस लीगची स्थापना केली. मग लाला हरदयाळ यांची भेट घेऊन गदर पार्टी उदयाला आली.

तुम्ही गदर पार्टीबद्दल वाचलं असेलंच. गदर या नियतकालिकेच्या मराठी आवृत्तीचे ते संपादकही होते. हे क्रांतिकार्य करत असताना पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी संशोधन ही कार्येही सुरुच होती. म्हणजे इंग्रजी सत्ता उखडून टाकण्यासाठी एका हातात भयानक स्फोटके तर देश बलवान करण्यासाठी दुसर्‍या हातात बियाणे असा संघर्ष त्यांचा सुरु होता.

पहिले महायुद्ध

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस त्यांना इराणला जावं लागलं. पुढे त्यांची भेट जर्मनीच्या सैन्याधिकाशी झाली. बलुचिस्थानातून भारतातील ब्रिटिशांवर आक्रमण करायचं अशी योजना होती. दुर्दैवाने ती योजना फसली. गदर पार्टीतल्या अनेक क्रांतिकारकांवर अटकेची टांगती तलवार होती. अनेकांना अटकही झाली. डॉ. खानखोजे ह्यांनाही दोनदा अटक झाली होती. पुढे त्यांनी मादाम कामा, लेनीन यांचीही भेट घेतली.

मेक्सिकोकडे प्रयाण

जर ब्रिटिशांच्या कपटी नजरांपासून वाचायचं असेल तर मेक्सिकोत जाऊन राहणं त्यांना योग्य वाटलं. आता मात्र कृषीक्रांतीला सुरुवात होणार होती. मेक्सिकोत त्यांनी कृषीशास्त्रातील पराक्रम केला.

मेक्सिकोत त्यांनी शेती केली. त्यांनी आपलं पूर्ण लक्ष कृषी क्षेत्राकडे वळवलं. त्यांनी तेवोमका हा मक्याचा नवा प्रकार निर्माण केला. इतकंच काय तर मका, गहू, सोयाबीन इ. पिकांच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणली. हायब्रीड मका, पाऊस, उन्ह, थंडी इतकंच काय तर बर्फातही तग धरेल असा गहू निर्माण केला, अधिकाधिक सोयाबीनचं उत्पादन तयार केलं अशा प्रकारची हरीतक्रांती त्यांनी घडवली यामुळे मेक्सिकन सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला.

त्यांनी कृषी विद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केलं आहे. मेक्सिनकन शिक्षण खात्याच्या संग्रालयात भिंतीवर असलेल्या राष्ट्राध्यक्ष व इतर लोकांच्या चित्रामध्ये डॉ. खानखोजे यांनाही स्थान मिळालं आहे. त्याखाली ’आता गरीबांना सुद्धा भाकरी मिळेल’ असं स्पॅनिश भाषेत लिहून ठेवलंय. ही डॉ. खानखोजेंची योग्यता आहे.

भारत सरकारकडून उपेक्षा

भारताने मात्र त्यांची ही योग्यता लक्षात घेतली नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर ते आपली पत्नी व मुलीसह मायदेशी परतले. पण एका महान माणसाची विटंबना कशी केली ते पाहा. इंग्रजांच्या ब्लॅक लिस्टमध्ये त्यांचं नाव होतं म्हणून भारतात आल्यावर त्यांन अटक झाली. अर्थात त्यांची पुढे सुटकाही झाली.

परंतु ज्या माणसाने मेक्सिकोमध्ये कृषीक्रांती घडवून आणली, त्या महान संशोधकाचे सल्ले तत्कालीन भारत सरकारला पटले नाहीत. तरी भारत सरकारने त्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. डॉ. खानखोजेंनी ही मदत नाकारली आणि तेच पैसे कृषीकार्यासाठी वापरावे असा सल्ला दिला. १८ जानेवारी १९६७ रोजी या महान क्रंतिकारकाने व कृषीतज्ञाने आपल्या प्राणांचा त्याग केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.