मुंबई पोलीस दलातील ‘बॉम्ब स्कॉड’ एक दुर्लक्षित विभाग 

150
कुठे बॉम्ब ठेवल्याचा हॉक्स कॉल (अफवा)  असो, अथवा कुठे बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू मिळू द्या सर्वात अगोदर बॉम्ब निकामी व शोधक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येते. शहरात कुठलीही मोठी घटना घडू नये यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बॉम्ब शोधण्यासाठी पासून तो बॉम्ब निकामी करण्यापर्यत या पथकातील अधिकारी आणि अंमलदार जीव धोक्यात टाकून काम करतात. पोलीस दलात काम करून देखील ‘बॉम्ब निकामी व शोधक पथक’ (बीडीडीएस) दुर्लक्षित राहिले आहे.
‘बीडीडीएस’अर्थात ‘बॉम्ब डिस्पोझल अँड डिटेक्शन स्कॉड’ मुंबईतील ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात खऱ्या अर्थाने या पथकाचे कौशल्य मुंबईकरांनी अनुभवले होते. त्यानंतर मुंबईत २००२ सालापासून सुरू झालेली बॉम्ब स्फोटच्या मालिकानंतर बॉम्ब निकामी आणि शोध पथकाकडून अनेक जिवंत बॉम्ब शोधून ते निकामी देखील करण्यात आले. काहींनी  प्रत्यक्षात तर काहीनी वृत्तवाहिन्यांवर या पथकाचे धाडस बघितले आणि त्यांचे कौतुक केले. या बॉम्ब स्फोटाच्या मालिकानंतर मुंबईत कुठे ना कुठे बॉम्ब ठेवल्याचे कॉल नियंत्रण कक्षामध्ये खण खणू लागले, आणि काही क्षणात हे पथक आपल्या श्वान पथकासह घटनास्थळावर दाखल होऊन बॉम्ब आहे की नाही याची खात्री करण्यासाठी हजर झाल्याचे पाहायला मिळाले.

या पथकाकडून ग्रीन सिग्नल मिळणे आवश्यक

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत होणाऱ्या घातपाताच्या घटना कमी झालेल्या असल्या तरी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाचे काम काही कमी झालेली नाही. मुंबईत अतिमहत्त्वाची व्यक्ती येणार असेल अथवा एखादी मोठी राजकीय सभा मुंबईत होणार असेल त्या ठिकाणची सर्वात आधी पहाणी करण्याचे काम व ती जागा सुरक्षित असल्याचा ग्रीन सिग्नल या पथकाकडून देण्यात येतो. या पथकातील अधिकारी सांगतात की, आज ही त्यांना दिवसभरात मुंबईत ५ ते ६ कॉल अटेंट करावा लागतात, तर व्हीआयपी मोमेंट आहे, इतर मोठ्या सभा असतात त्या ठिकाणी देखील आम्हाला जाऊन तपासणी करावी लागती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएलच्या ठिकाणी आम्हाला २४ तास सतर्क राहावे लागते. स्टेडियमची पहाणी करून कुठे काही संशयास्पद वस्तू आढळते का या सर्वांवर लक्ष ठेवून रहावे लागते असे बीडीडीएस मधील अधिकारी यांनी सांगितले.

….तरीही वरिष्ठांकडून दुर्लक्षित

मुंबई पोलिसांचाच एक भाग असलेला बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे  नेहमी दुर्लक्षित राहिले आहे, मुंबईसाठी सर्वात महत्वाचे युनिट म्हणून म्हणून बॉम्ब निकामी आणि शोधक पथकाकडे बघितले जात असले तरी या पथकातील अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचे कार्यालय अडगळीच्या ठिकाणी आहे. त्यांना देण्यात येणारी सुविधा इतर पोलीस यंत्रणेपेक्षा तुटपुंजी आहे. मागील काही वर्षांपासून बीडीडीएसचा जोखीम भत्ता देखील  बंद करण्यात आला आहे, जोखीम भत्ता मिळविण्यासाठी पथकाकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी वरिष्ठांकडून त्याला कुठलीही दाद देण्यात येत नाही.

बॉम्ब निकामी आणि शोध पथक…

संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अखत्यारीत येणारे बॉम्ब निकामी आणि शोध पथकात अधिकारी आणि अंमलदार मिळून १३४ जणांचे पथक आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलिस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक आणि इतर अंमलदार असे एकूण १३४ जणांचे पथक आहे. हे पथक १२ युनिट मध्ये विभागले गेले असून प्रत्येक परिमंडळात या पथकाचे युनिट आहे. या पथकात श्वान पथकाचा समावेश असून एकूण १४ श्वान पथकात आहे. या पथकाचे पूर्वी मूळ कार्यालय क्रॉफर्ड मार्केट येथील एलटी मार्ग या ठिकाणी होते, मात्र इमारत जर्जर झाल्यामुळे हे कार्यालय काळाचौकी या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.