सर्वांना घर देणार्‍या म्हाडाचं पहिलं ऑफिस कधी निर्माण झालं? वाचा म्हाडाचा इतिहास…

127

ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो गर
तो पहले आ के माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र

घर घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. विशेषतः मुंबई नावाच्या मायानगरीत आपलं स्वतःचं घर असावं, हे स्वप्न उराशी बाळगूनच इथला तरुण आपल्या करिअरला सुरुवात करतो. हे स्वप्न पूर्ण करायला मदत करते ती म्हाडा. म्हाडा म्हणजे गोरगरीबांना घरे मिळवून देण्याचा कारखाना…

( हेही वाचा : आता आम्ही काय खायचे? बेस्ट कामगार झाले संतप्त! )

काय आहे म्हाडा?

म्हाडा म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. मुंबईत तर म्हाडाचे अनेक प्रकल्प उभे आहेत. दिवसेंदिवस मुंबईची वाढत जाणारी लोकसंख्या पाहिली की इथली सगळी जंगले नष्ट करावी लागतील, समुद्रावर भरणी घालावी लागेल.

मुंबई हे औद्योगिक केंद्र असल्यामुळे इथली लोकसंख्या वाढत गेली आणि या लोकसंख्येला छत मिळावं म्हणून झोपडपट्ट्या वाढल्या. मग झोपडपट्ट्यांना अधिकृत करणारी एसआरए ही योजना अस्तित्वात आली. म्हाडा देखील अशाच गरीब लोकांचं स्वप्न पूर्ण करणारी एक संस्था आहे.

बॉम्बे हाऊसिंग बोर्ड

म्हाडाची संकल्पना सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी कै. गुलझारीलाल नंदा ह्यांनी मांडली. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा महाराष्ट्राला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नव्हता. बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. गुलझारीलाल हे बाळासाहेबांच्या मंत्रीमंडळात कामगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि अपुरी पडणारी घरे ही सरकारसमोरची प्रमुख समस्या होती. खाजगी घरे घेणं हे सर्वसामान्य लोकांना परवडणारं नव्हतं. आज तर मुंबईत घर घेणं हे जवळजवळ अशक्य होऊन बसलेलं आहे. पण त्या काळी यातून एक मार्ग काढण्यात आला. सर्वसामान्य माणसाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून गुलझारीलाल यांच़्या दूरदृष्टीतून एक संस्था निर्माण झाली. त्या संस्थेचं नाव होतं, बॉम्बे हाऊसिंग बोर्ड, म्हणजे आताची म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण).

१९४९ साली ही संस्था अस्तित्वात आली. १९५० मध्ये पहिल्यांदा खार येथे एक वसाहत निर्माण झाली. सर्वसामान्य माणसाला ३५० चौ. फू. क्षेत्रफळाचं घर मिळालं… पण त्या काळी लोकांनी ही घरे घेतली नाहीत. या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पैशांचा अपव्यय, सरकारी तिजोरीचा चुराडा अशी टिकाही तेव्हा झाली. पुढे मात्र लोकांना या घराची किंमत कळली, गरज भासू लागली व हळूहळू या योजनेला प्रतिसाद मिळू लागला. स्थलांतरीत कामगारांना तर घराची आवश्यकता होतीच.

जन्म म्हाडाचा

महाराष्ट्र हे वेगळं राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेने काही शहरात घरे उपलब्ध करुन दिली. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या संस्थेने देशातील सर्वात मोठी वसाहत बांधली होती. सुमारे साडे दहा हजार सनदिका असलेली कन्नमवारनगर वसाहत.

मग अशा घरांच्या मागण्या वाढू लागल्या. लोकांना या घरांचे महत्व पटू लागले. सरकारला मुंबईतील गलिच्छ वस्ती नष्ट करुन त्यांना एक चांगले राहणीमान द्यायचे होते. म्हणून महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार मंडळाची स्थापना १९७४ साली करण्यात आली. घरांच्या वाढत्या मागणीमुळेच १९७६ साली म्हाडाची स्थापना झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम, १९७६ द्वारे करण्यात आली. ५ डिसेंबर १९७७ रोजी हे स्वप्न अस्तित्वात आले.

आता म्हाडाद्वारे ७ गृहनिर्माण मंडळांच्या क्रियाकलपांचे समन्वय व नियंत्रण केले जाते. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ हे म्हाडाच्या अंतर्गत येते. मुंबई या संस्थेद्वारे सुमारे ३ लाख घरे बांधली गेली आहेत. तसेच राज्यभरात सुमारे ७.५० लाख घरे सर्वसामान्यांना बांधून दिलेली आहेत.

लोक आजही म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. आपल्यालाही म्हाडाची लॉटरी लागावी आणि आपलेही स्वतःचे हक्काचे घर व्हावे ही आशा आजही अनेक लोक पाहत आहेत. म्हाडा या सर्वांची आशा सत्यात उतरवत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.