गॅस सिलिंडरची किंमत हजाराच्यावर गेली आहे, महागाई वाढलेली आहे. त्यावर काही बोलत नाही. पण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. ए टीम, बी टीम, सी टीम बनवल्या आहेत, मग कुणा ओवैसीला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवले जाते, कुणाच्या हातात भोंगा दिला जातो आणि स्वतः मजा बघत बसतात, टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेतात. अशा टीनपाटांना झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे. तुमच्या बापाचा माल वाटला का, बापाचा पैसा आहे का, तिकडे काश्मीरमध्ये राहुल भट्ट मला सुरक्षा द्या, असे सारखे म्हणत होता, त्याला सुरक्षा का दिली नाही, असा कडक सवाल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला.
मागील महिनाभरापासून भाजप, मनसेच्या सभा होत आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्याला उत्तर म्हणून शनिवारी, १४ मे रोजी वांद्रे, बीकेसी येथे शिवसेनेची जाहीर सभा घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
फडणवीसांचे वय किती, बोलता किती?
तुमच्यामुळे काँग्रेसबरोबर गेलो, हिंदुत्व काय धोतर वाटले का, हे हिंदुत्व नेसणे आणि सोडण्यासारखे नाही. आम्ही उघडपणे गेलो, तुमच्यासारखे पहाटेच्या शपथविधीसारखे गेलो नाही. जर तो शपथविधी टिकला असता तर आज नवाब मलिक, अनिल देशमुख यांचे गुणगान गात राहिले असते. काश्मिरात मुफ्ती महंमद सईद सोबत सरकार स्थापन केले, तेव्हा तिने तुमच्या कानात हनुमान चालीसा म्हटली होती का? बाबरी पाडली तेव्हा फडणवीस यांचे वय किती होते? काय तुमचे वय, बोलता किती? तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केले? तुम्ही देवेंद्र तिकडे गेले असता, तर नुसते पाऊल जरी बाबरीवर ठेवले असते तरी ती पडली असती. तेव्हा आडवाणी यांनी सांगितले की, बाबरीवर चढलेली माणसे मराठी बोलत होती. त्यावेळी प्रमोद महाजन त्या लोकांना समजावत होते, तरी ते ऐकायला तयार नव्हते, जे प्रमोद महाजन यांचे तेव्हा ऐकत नव्हते, ते कोण असतील. बाबरी पडली तेव्हा बाळासाहेबांना फोन आला आणि ते म्हणाले ज’र बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे. जो नेता लोकांना भडकावून त्यांची जबाबदारी झिडकारत असेल तर ते नेतृत्व नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community