चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय आहे. पाहुण्यांना एक कप चहा दिल्याशिवाय पाहुणचार पूर्ण होत नाही. एकंदरच काय तर चहा प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळच्या चहाने प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात होते तर काही जणांना अगदी रात्री १० च्या ठोक्यालाही चहा हवाहवासा वाटतो. आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये चहाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात या चहाचे स्वरुप बदलत जाते. विविध भागात आढळणाऱ्या चहांच्या प्रकांराविषयी आपण आज माहिती घेऊया… या विविध चहांचा आस्वाद तुम्ही घेतलात का?
गुर-गुर चहा ( बटर टी) – लडाख
लडाख, नेपाळ, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, भूतानमध्ये हा गुर-गुर चहा प्रसिद्ध आहे. या चहाची लडाखचा बटर टी अशीही ख्याती आहे. हा एक गुलाबी रंगाचा खारट चहा आहे जो उकळत्या चहामध्ये बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून बनवला जातो. तिखट-खारट चवीचा हा चहा आरोग्यालाही फायदेशीर असतो.
काहवा – काश्मिर
वाळलेली पाने आणि मसाले केसरयुक्त काश्मिरी चहा काहवा म्हणून ओळखला जातो. यामध्ये दालचिनी, केसर, वेलची आणि लवंग आदी मसाल्यांचा समावेश असतो. यामुळे तुमची त्वचा सुद्धा तजेलदार राहण्यास मदत होते.
कांगडा चहा – हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील कांगडा हा भाग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कांगडा चहाच्या लागवडीची सुरूवात ब्रिटीशांनी केली त्यांनी हा चहा चीनवरून आणला होता त्यामुळे याला चायनीस हायब्रिड टी असेही म्हटले जाते. यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. कांगडा चहाची चव आणि सुगंध इतर चहांपेक्षा वेगळा आहे.
लाल चहा – आसाम
आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगालपासून ते संपूर्ण ईशान्य भारतात तुम्हाला लाल चहाचा आस्वाद घेता येईल. हा चहा दुधाशिवाय तयार केला जातो. त्यात अगदी कमी प्रमाणात साखर टाकली जाते. चहाचा रंग लालसर तपकिरी असतो म्हणून त्याला लाल चहा हे नाव पडले. तुम्ही कधी आसाम किंवा ईशान्य भारतात गेलात तर नक्कीच लाल चहाचा आस्वाद घ्या. या चहाची चव हलकीशी कडू असेल परंतु हा चहा आरोग्यासाठीही खूप चांगला आहे.
मुघलाई चहा – दिल्ली
मुघलाई चहाची चव सामान्य चहापेक्षा वेगळी असते. जर तुम्हाला मुघलाई चहा प्यायचा असेल तर दिल्लीतील जामा मशिदीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या मोहम्मद आलम मुघलाई या चहाच्या स्टॉलवर तुम्ही अस्सल मुघलाई चहाचा आनंद घेऊ शकता. गेल्या 50 वर्षांपासून येथे मुघलाई चहा बनवला जातो.
नाथद्वारा पुदिना चहा – राजस्थान
राजस्थानमधील नाथद्वारा हे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी मातीच्या कपमध्ये हा पुदिना चहा दिला जातो. ही चहा म्हणजे लेमन ग्रास, पुदिना, मसाले यांचे मिश्रण…
इराणी चाय – हैदराबाद
चार मिनार येथे मिळणारा इराणी चहा खूप लोकप्रिय आहे. तिथले लोक हैदराबादी बिस्किट किंवा मस्का पाव सोबत या इराणी चहाचा आस्वाद घेतात. हा चहा बनवताना खव्याचा वापर सुद्धा केला जातो.
मीटर चाय – तामिळनाडू
तामिळनाडू राज्य कॉफीसाठी प्रसिद्ध असले तरी येखील मीटर चहाही खूप प्रसिद्ध आहे. मीटर चहा कॉफीसारखाच बनवला जातो. हा चहा बनवण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळेच त्याला मीटर चहा म्हणतात.
मसाला चहा – उत्तर व पूर्व भारत
मसाला चहा हा सर्वात आवडत्या चहा प्रकारांपैकी एक आहे. या चहामध्ये काळी मिरी, वेलची, लवंगा, तुळशीची पाने, दालचिनी, लेमनग्रास या मसाल्यांचा वापर केला जातो.
कटिंग चहा – मुंबई
एक कटिंग देना असे मुंबईतील चहाच्या टपऱ्यांवर आपल्याला सर्रास ऐकू येते. सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडीचे पेय म्हणजे कटिंग चहा…
अद्रकवाली चाय
भारतात घरोघरी बनवली जाणारा आल्याचा चहा. दूध, चहापावडर आणि आले यांच्या मिश्रण करून हा चहा बनवला जातो.
सुलेमानी चहा – केरळ
सुलेमानी चहा केरळमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. सुलेमानी चहा हा ब्लॅक टी प्रमाणे असतो. यामध्ये पुदिना, दालचिनी, लवंग, वेलची अशा मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो.
तंदूरी चहा
तंदूरी चहा सोशल मिडिया माध्यमांमुळे सर्वाधिक लोकप्रिय झाला. भट्टीतून मातीचा कप काढून यात उकळत चहा ओतला जातो. चहाप्रेमींनी तंदूरी चहाचा आस्वाद नक्की घ्यावा.
या चहाच्या प्रकारांपैकी तुम्ही कोणता चहा ट्राय केलाय? …आणि तुम्हाला भविष्यात कोणता चहा ट्राय करण्याची इच्छा आहे हे आम्हाला नक्की कळवा…
Join Our WhatsApp Community