अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या जवळील समुद्रकिना-यावर तब्बल ९ फुटांच्या डॉल्फिनचा मृतदेह आढळला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. बॅण्ड स्टॅण्डच्या समुद्रात अडकलेल्या डॉल्फिनचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत दिसून आला.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घटना
मुंबईत गेल्या काही महिन्यांत पुन्हा समुद्रकिना-याजवळ मृत समुद्री जीव आढळून येत आहेत. एप्रिल महिन्यात जुहू, वर्सोवा येथे अर्ध्या डझनहून अधिक समुद्री जीव मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला नरिमन पॉइंट येथेही ८ ते ९ फुटांच्या डॉल्फिनचा सडलेल्या अवस्थेतील मृतेदह आढळला. मे महिन्यात मृत सागरी जीवांचे प्रमाण कमी दिसून येत असताना, शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास बॅण्ड स्टॅण्ड येथील समुद्रातील खडकाळ दगडांत डॉल्फिनचा मृतदेह आढळला. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली होती.
कारण अस्पष्ट
रात्री अंधारात डॉल्फिनला बाहेर काढणे अडचणीचे ठरले. डॉल्फिनला पालिका आपत्कालीन विभाग आणि कांदळवन कक्षाने काही मजूर बोलावून मृतदेहाला दोरीने बांधून घेतले. जेसीबीच्या सहाय्याने समुद्राबाहेर काढल्यानंतर त्याला डंपरच्या सहाय्याने तातडीने वर्सोवा समुद्रकिनारी वाळूत गाढले गेले, या कामाला तीन तास लागले. यामागील नेमके कारण कांदळवन कक्षाने स्पष्ट केले नसून, जल प्रदूषणामुळेच मुंबई समुद्रकिनारे व नजिकच्या भागांत समुद्री जीव मरत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community