विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवार 15 मे रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सभा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी भाजपकडून या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेची सगळ्यांनाच उत्सुकता असताना, सभेच्या मंचावर एक आश्चर्यकारक प्रकार पहायला मिळाला. फडणवीस यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर गाणे गाणा-या गायकाला तेथून बाजूला करण्यात आले आणि त्याला दुस-या जागी जाण्यास सांगितले. त्यावेळी या दृश्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काय झाले नेमके?
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी सभेच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस मंचावर स्थानापन्न झाले तेव्हा एक गायक मंचावर गाणे गात होता. त्यामुळे समोरील प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांना फडणवीस यांची दृश्ये टिपण्यात अडथळा होत होता. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकाला चालू गाण्यात बाजूला व्हायला सांगितले आणि मग सर्व कॅमेरांना फडणवीसांचे दर्शन झाले.
हनुमान चालिसा म्हणत आरंभ
भाजपच्या या हाय व्होल्टेज सभेसाठी फडणवीसांसह राज्यातील सर्वच भाजप नेते मंचावर उपस्थित होते. त्यावेळी सभेला सुरुवात करण्यापूर्वी हनुमान चालिसा पठण करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने आपल्या सभेतून आपली हिंदुत्ववादी भूमिका दाखवून दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community