सॅटलाईट टॅगिंग झालेल्या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्रातील भ्रमणमार्गात नवी रंजक माहिती समोर आली आहे. प्रथमा, सावनी आणि रेवा या तीन मादी कासवांच्या भ्रमणमार्गात आठवड्याभरात झालेला बदल पाहता तिन्ही मादी ऑलिव्ह रिडले खाद्याच्या शोधासाठी एकाच ठिकाणी भेटणार असल्याची शक्यता या कासवांवर संशोधन करणा-या भारतीय वन्यजीव संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर. सुरेशकुमार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या किना-यावर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी आलेल्या पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांना वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव मंडळाने सॅटलाईट टॅगिंग करुन जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडले. यापैकी प्रथमा या पहिल्या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने गुजरातपर्यंत मजल मारल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी राज्यातील समुद्रकिना-यात पुनरागमन केले.
गेल्या आठवड्यात ती मुंबई किना-या जवळील खोल समुद्रात होती. आता ती सॅटलाईट टॅगिंग झालेल्या वेळास समद्राला लागून समांतर खोल समुद्रात आढळल्याचे सॅटलाईट संपर्कातून दिसून आले. वेळासपासून प्रथमा २५० किलोमीटर खोल समुद्रात संचार करत आहे. प्रथमापासून दक्षिणेकडे सावनी आणि वनश्री या दोघीही महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्याच्या समुद्रकिना-यात फिरत आहेत. सावनी सध्या मालवणच्या किना-यापासून बरेच अंतर लाब आहे. वनश्री मात्र दक्षिणेकडील समुद्राच्या भागांत फारच कमी वेगाने जात असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणातून समोर आले.
(हेही वाचा – कोकणातील ‘ही’ दोन ठिकाणं ठरली ‘बेस्ट रिव्ह्यू ऑफ दि इयर’!)
गेल्या तीन महिन्यांपासून सतत दक्षिणेकडील समुद्रातच एका मार्गाने जाणारी रेवा मात्र आता पुन्हा गोव्याच्या दिशेकडील समुद्रात जात असल्याने सर्वचजण अचंबित झाले. रेवा आणि सावनी यांच्यात बरेच अंतर असले तरीही दोघीही एकमेकांसमोरील दिशेनेच पुढेच जात असल्याचा अंदाज भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर.सुरेशकुमार यांनी व्यक्त केला. दोघांना कालांतराने प्रथमाही येऊन भेटेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
…म्हणून भेटणार तिन्ही ऑलिव्ह रिडले कासव
या तिघींनाही एकाच ठिकाणातील भूभाग अगोदरपासूनच परिचयाचा असावा. कित्येकदा समुद्रातील अंतर्गत भूभागातील पाणी वरती येते. अशावेळी कासवांचे खाद्यही समुद्राच्या वरच्या तळांत साठते. खाद्य खायला कासव एकाच ठिकाणी जमतात.
Join Our WhatsApp Community