काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीशी काडीमोड घेणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. याचबाबतीत आता पटोले यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपण केलेल्या तक्रारीवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
काय म्हणाले पटोले?
अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, तेव्हा त्याचे आता उल्लंघन होताना दिसत आहे. राष्ट्रवादीकडून सातत्याने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न होत आहे. हा आमच्या अध्यक्षा अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अपमान असून, आम्ही तो अजून सहन करणार नाही. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, त्यामुळेच आम्ही पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेबाबत तक्रार केली आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील. त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.
(हेही वाचाः नानांच्या आरोपांत पाणी मुरतंय, काँग्रेसच्या मंत्र्यांनीच केले स्पष्ट)
नानांचा पलटवार
राष्ट्रवादीने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या नानांच्या आरोपावरुन अजित पवार यांनी नानांवर टीका केली होती. असे आरोप करणा-यांनी आपली राजकीय पार्श्वभूमी तपासावी, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याला आता नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. मी भाजप सोडताना समोरुन राजीनामा दिला. पहाटेच्या शपथविधीबाबत वेळ आल्यावर बोलेन असे अजित पवार यांनी म्हटले आहे, त्यांनी त्यावर लवकर बोलावे. जे माझ्यावर टीका करत आहेत, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासून घ्यावी, असा पलटवार पटोले यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community