राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे, त्या आर्थर रोड तुरुंगात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १९ वर्षीय कैद्याने २० वर्षीय कैद्याला मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कारागृह हादरले. कैद्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठार मारण्याची धमकी
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचे संपूर्ण देशभरात नाव आहे. या कारागृहात बडे गँगस्टर, राजकारणी, तसेच बड्या घोटाळ्यातील आरोपी, बॉलिवूडसंबंधी व्यक्ती राहून गेले आहे. सध्या या कारागृहात राज्य सरकार मधील दोन मंत्र्यांना ठेवण्यात आले असताना, रविवारी मध्यरात्री या तुरुंगातील सर्कल १ मध्ये एका कैद्यावर दुसऱ्या कैद्याने लैगिंक अत्याचार केला. १९ वर्षीय कैद्याने एकाच बॅरेकमध्ये असलेल्या २० वर्षीय कैद्यांचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली, त्यानंतर बळजबरीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला व याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
( हेही वाचा: यंदाही मुंबईची तुंबई होणार का? पत्र लिहित राणेंनी विचारले मुख्यमंत्र्यांना प्रश्न )
कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सोमवारी सकाळी या पीडित कैद्याने हा प्रकार कारागृहातील पोलिसांना कळवला. कारागृह अधिकारी यांनी तत्काळ आरोपी कैद्याला ताब्यात घेऊन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कैद्याचा जबाब नोंदवून १९ वर्षीय आरोपी कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार, मारहाण करणे, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेला कैदी हा गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहणारा असून, त्याला एका गंभीर गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीनंतर त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. कारागृहात घडलेल्या या घटनेनंतर येथील कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून इतर सामान्य कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Join Our WhatsApp Community