ताडोबात वाघाच्या हल्ल्यात तीन दिवसांत दुस-यांदा माणसाचा बळी गेला आहे. ताडोबा-अंधेरी बफर झोन क्षेत्रातील मूल तालुक्यातील भडुर्णा गावाजवळच्या जंगलात 15 मे रोजी रात्री वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. कौशल सोनुले (५४) असे मृताचे नाव असून तेंदूची पाने गोळा करण्यासाठी दुचाकीने गावाजवळील ७ किलोमीटरच्या जंगलात गेला होता.
( हेही वाचा : BEST विषयी काही तक्रार आहे का? घरबसल्या या ठिकाणी संपर्क साधा )
कौशल सोनुले रात्रीपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता. १६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा मृतदेह कम्पाऊण्ड क्रमांक ७९२ जवळ आढळून आला. शरीराचे काही अवयव नजीकच्या भागांत सापडले. तासाभराने सोनुले यांचा मृतदेह घटनास्थळावरुन मूल रुग्णालयात पाठवला गेला. वनविभागाने तातडीने मृताच्या कुटुंबीयांना पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई दिली. या भागांत दोन वाघांचा वावर आहे. त्यामुळे हल्लेखोर वाघ शोधण्यासाठी वनविभागाने संबधित ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. याआधी शनिवारीही मोहार्ली येथे तेंदुची पाने गोळा करायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला झाला होता. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह सकाळी आठ वाजता सापडला.
काय काळजी घ्याल?
- जंगल व नजीकच्या प्रदेशात वाघाचा वावर असलेल्या ठिकाणी भल्या पहाटे किंवा सायंकाळनंतर तेंदूची पाने गोळा करायला जाऊ नका. या वेळेत वाघाचा वावर हमखास असतो.
- तेंदुची पाने गोळा करताना एकट्याने जंगलात जाऊ नका. समूहाने एकत्र जा.
- तेंदूची पाने गोळा करताना इतरांनी पहारा ठेवायला हवा. तेंदूची पाने जमिनीवर बसून गोळा करावी लागतात. वाघाला डोळ्यांना समांतर दिसणारे आपले भक्ष्य वाटते. त्यामुळे माणसावर हल्ला होतो.