राजधानी एक्सप्रेसनं गाठली वयाची ‘हाफ सँच्युरी’!

164

भारतीय रेल्वेने आपल्या 169 वर्षांच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. वाफेच्या इंजिनापासून ते बुलेट ट्रेनपर्यंतचा प्रवास आता सुरू आहे. रेल्वेच्या इतिहासात आणखी एका विशेष दिवसाची भर पडली आहे. देशातील प्रिमियम पॅसेंजर ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने (Mumbai-New Delhi Rajdhani Express) 50 वर्षे पूर्ण केली असून वयाची ‘हाफ सँच्युरी’ गाठली आहे. 50 वर्षांपूर्वी म्हणजे 17 मे 1972 रोजी, या ट्रेनने बॉम्बे सेंट्रल ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली असा प्रवास सुरू केला होता. भारतातील पहिली संपूर्ण वातानुकूलित ट्रेन नवी दिल्ली आणि हावडा (कोलकाता) दरम्यान धावली. त्यानंतर बरोबर तीन वर्षांनी ही सेवा सुरू झाली. पूर्वी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या इतर गाड्या होत्या. सध्या राजधानी एक्सप्रेस गाड्यांच्या 25 जोड्या कार्यरत आहेत.

(हेही वाचा – तुम्ही कोणाला ‘टकल्या’ म्हणून चिडवताय? तर सावधान! कारण…)

70 च्या दशकात वेग आणि आलिशान प्रवासाचे प्रतीक असलेली, भारतीय रेल्वे सेवेत एकप्रकारे क्रांती आणणारी मुंबई – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आज मंगळवारी 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्याचे आजही अनेकांचे स्वप्न असते. विशेष म्हणजे वेळेवर धावणारी व पूर्ण वातानुकूलित असलेल्या या रेल्वेचे ग्लॅमर तसूभरही कमी झालेले नाही म्हणून या रेल्वेने प्रवास करणे आजही लोकांना प्रतिष्ठेचे वाटते.

मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांत कापता येणार

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी एक्स्प्रेसने भारतीय रेल्वे रुळावरील आपली पकड मजबूत करत गेल्या ५० वर्षांत इंजिन, डबे आणि सेवा सातत्याने अद्ययावत केल्या आहेत. मुंबई ते दिल्ली १९ तास आणि ५ मिनिटांचा प्रवासी वेळेत सुरू झालेला प्रवास आता १५ तास आणि ५० मिनिटांवर आला आहे. १९८८ पर्यंत १२० किमी प्रतितास या गतीने चालणारी राजधानी एक्स्प्रेस सर्वांत जलद गाडी होती. आता आधुनिक स्वरूपातील वंदे भारत आणि काही शताब्दी गाड्या जलदगतीने धावत आहेत. येत्या चार वर्षांत रेल्वे रुळ अद्ययावत केल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस प्रतितास १६० किमीच्या गतीने धावणार आहे त्यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांत कापता येणार आहे.

50 वर्षांच्या चिरतरूण राजधानीला प्रवाशांची पसंती

सद्य:स्थितीत 50 वर्षांच्या चिरतरूण राजधानीला प्रवाशांची पसंती मिळत असून ती सर्वांत लोकप्रिय आहे. इतर प्रकारांतील गाड्यांपेक्षा राजधानी प्रकारातील गाड्यांना सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. राजधानी एक्स्प्रेस चालविण्यासाठी उत्कृष्ट रेकॉर्ड असलेल्या वरिष्ठ लोको पायलटची निवड केली जाते.

असा आहे राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास

  • 1 मार्च 1969 मध्ये पहिली राजधानी एक्स्प्रेस नवी दिल्ली हावडादरम्यान चालविण्यात आली
  • 17 मे 1972 मध्ये मुंबई-दिल्ली मार्गावर राजधानी एक्स्प्रेस सुरू
  • 2 ऑक्टोबर 1981 मध्ये डब्यांची संख्या 18 पर्यंत वाढवली, दोन इंजिनांद्वारे गाडी चालविली
  • 2 ऑक्टोबर 2000 पासून राजधानी एक्स्प्रेस दैनिक गाडी चालविण्यात आली
  • 15 डिसेंबर 2003 रोजी राजधानी एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्यात आले
  • मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला 19 जुलै 2021 मध्ये भारतीय रेल्वेत प्रथम तेजस प्रकारातील शयनयान डबे जोडले
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.