भारताच्या सागरी क्षमतांना बळ देण्यासाठी, भारतीय नौदलाच्या सुरत आणि उदयगिरी या दोन आघाडीच्या युद्धनौकांचे मंगळवारी 17 मे 2022 रोजी माझगाव डॉक्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे एकाच वेळी जलावतरण करण्यात आले. या दोन्ही युद्धनौकांच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार हेही उपस्थित होते. भारतीय नौदल, सुरत हे ‘प्रोजेक्ट 15B’ विनाशिका आहे, तर उदयगिरी हे प्रोजेक्ट 17A फ्रिगेट आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने सांगितले की, दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकत्र लाॅन्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय नौदलाची वाढली ताकद
भारतीय नौदलात प्रोजेक्ट 15B अंतर्गत सुरत ही विनाशिका आणि प्रोजेक्ट 17A अंतर्गत उदयगिरी फ्रिगेट या युद्धनौका 17 मे ला नौदलात दाखल करण्यात आल्या. या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाची ताकद अधिक वाढली आहे. सुरत हे P15B वर्गाचे चौथे मार्गदर्शित डिस्ट्राॅयर आहे, तर उदयगिरी हे P17A वर्गाचे दुसरे स्टेल्थ फ्रिगेट आहे. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदल रचना संचालनालयाच्या (DND) अंतर्गत करण्यात आली आहे. या युद्धनौकांचे 75 टक्के काम हे मेक इन इंडिया अंतर्गत करण्यात आले आहे.
सरकारच्या वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप
राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात या युद्धनौकांना देशाची सागरी क्षमता वाढवण्याच्या सरकारच्या अतूट वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप म्हणून वर्णन केले. कोविड-19 आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना, भारताने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. कोरोना असूनही जहाज उत्पादन उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल आणि सध्याच्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी एमडीएलचे (MDL) अभिनंदन केले.
कान्होजी आंग्रे एक कुशल नौदल प्रमुख होते
भारताच्या नौदलात ज्या व्यक्तींची नावे प्रामुख्याने घेतली जातात त्यात कुंजली मरक्कर तसेच, वीर शिवाजी आणि कान्होजी आंग्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. ते अत्यंत कुशल होते. त्यांनी आपल्या नौदलाच्या शक्तीने ब्रिटीश, डच आणि पोर्तुगीज जहाजांवरही कर आकारले होते. त्यावेळी विदेशातील अत्यंत प्रगत नौसेनादेखील कान्होजा आंग्रेना हरवू शकले नाहीत. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय नौदलाने एका फ्रिगेटचे नाव कान्होजी ठेवल्याचे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
हा गौरवाचा क्षण
आता ज्या पद्धताने भारत आत्मनिर्भरतेकडे वळाला आहे, त्यानुसार येत्या काही काळात भारत केवळ मेक इन इंडियाच नाही तर ‘मेक फाॅर द वर्ल्ड’चेही स्वप्न पूर्ण करेल, अशी आशा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. आज भारत देश हा जगातील एक फास्टेस्ट ग्रोवींग इकोनाॅमी असल्याचे, राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे की, भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आणि 1971 ला झालेल्या युद्धाच्या विजयाचे 50 वे वर्ष या निमित्ताने देशासाठी याहून चांगली भेट असू शकत नाही, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित पल्ला आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण )
माझगाव हे एक ऐतिहासिक नाव
या गावाचे मूळ नाव मत्स्यगाव असल्याचे अनेक जण म्हणतात. तर काही जण माझं गाव असेही संबोधतात. पण, मला यातलं सर्वाधिक आवडलेलं नाव म्हणजे माझं गाव, म्हणेज माझं आपलं गाव वाटतं. माझगावला जर भारताचे प्रातिनिधिक गाव म्हटलं तर काही वावग ठरणार नाही असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.