चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक

161

चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टरचे ऑनलाइन बुकिंग करणे एका तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीच्या बँक खात्यातून पावणे तीन लाख रुपये काही मिनिटात काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे कळताच या तरुणीने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा : १३ हजार वाहन चालकांवर गुन्हे दाखल, विनाहेल्मेट प्रकरणात ४ हजार जणांवर कारवाई)

अंकिता ठक्कर असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. मुलुंड पश्चिम येथे राहणाऱ्या अंकिताच्या जवळचे ५५ नातेवाईक चारधाम यात्रेसाठी ११ मे रोजी जाणार होते. अंकिताची आई देखील यात्रेला जाणार असल्यामुळे तिने एप्रिल महिन्यात एका वेबसाइटवरून हेलिकॉप्टरची ८ तिकिटे बुक केली होती, इतर नातेवाईकांना हेलिकॉप्टरची सेवा पाहिजे असल्यामुळे त्यांनी अंकिताला बुकिंग करायला सांगितले. मात्र अंकिताने ज्या वेबसाइटवरून बुकिंग केले होते त्या वेबसाइटवर बुकिंग फुल्ल दाखवत असल्यामुळे अंकिताने गुगल सर्च इंजिन वर हेलिकॉप्टर एजंटचा शोध घेतला असता त्या ठिकाणी श्रीमाँ वैष्णोदेवी शेरिन ही वेबसाईट दिसली. या वेबसाइटवर आकाश सिंग नावाच्या एजंटचा मोबाईल क्रमांक तिला मिळाला. तिने त्या क्रमांकावर फोन करून हेलिकॉप्टर सर्व्हिस बुकिंगबाबत चौकशी केली असता त्याने ‘माझ्या व्हॉट्सअ‍ॅप वर माहिती पाठवा’ असे अंकिताला सांगितले.

सायबर फसवणुकीचा प्रकार

अंकिताने व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती पाठवल्यानंतर एका तिकिटाचे ४ हजार ६८० रुपये या प्रमाणे पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. अंकिताने सिंग यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठवले असता समोरच्या व्यक्तीने तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तिकीट पाठवले, त्यानंतर तिने पुन्हा ८ तिकीटे बुक करण्यासाठी सांगितले असता त्याने ८ तिकिटे पाठवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अंकिताने पुन्हा १० तिकिटांची बुकिंग केली व त्याची रक्कम पाठवली, दुसऱ्या दिवशी अंकिताच्या मोबाईलवर फोन आला व इन्शुरन्सचे ३२२०७ रुपये पाठवण्यास सांगितले. मात्र अंकिताने पैसे देण्यास नकार दिला आणि फोन बंद करताच काही मिनिटात तिला बँकेच्या खात्यावरून १ लाख ९७ हजार ५१८ रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे पाच वेगवेगळे मेसेज आले. आपली फसवणूक झाली असल्याचा संशय येताच तिने व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले हेलिकॉप्टर सर्व्हिसचे तिकीट तपासले असता ते तिकीट सुद्धा बोगस आल्याचे तिच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे कळताच तिने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सायबर फसवणुकीचा प्रकार असून गुगलवर मिळालेला मोबाईल क्रमांक बोगस असल्याचे सामोर आले आहे. अंकिताची एकूण २ लाख ८७ हजार ४३८ रुपयाची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.