राजकीय वर्तुळात अयोध्या दौऱ्यावर चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जूनमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. अशातच त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी आता साध्वी कांचनगिरींनी केलेल्या दाव्यांमुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाविषयी खेद व्यक्त केला होता, असा दावा साध्वी कांचनगिरी यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी परप्रातियांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पश्चाताप होतोय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
काय केला साध्वी कांचनगिरींनी दावा
चार महिन्यांपूर्वी साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी मला बोलावून मानसन्मान दिला, अशी माहिती कांचनगिरी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मी तेव्हा राज ठाकरेंना विचारले की, तुम्ही जे उत्तर भारतीयांसोबत केले ते योग्य होते का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, माताजी आमची चूक झाली आहे. राज यांच्या या वक्तव्याबाबतचा व्हिडीओ मी दाखवू शकते. तेव्हा पत्रकार परिषद होती, तिथे सगळे पत्रकार उपस्थित होते. जर त्यांनी एका संताची माफी मागितली आहे. तर मी पण म्हणते, आपण त्यांना माफ करा आणि तुम्ही तिथे स्टेज तयार करा. तेथे येऊन ते माफी मागतील आणि आपली चूक कबूल करतील आणि हे माझं काम असेल, असे साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान खासदार बृजभूषण यांना सांगितले.