धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात आनंद दिघेंचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. ‘गद्दारांना क्षमा नाही’, ही ताकीद असो वा ‘जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचे नाही’, हा धमकीवजा सल्ला असो या दोन वाक्यांनी आनंद दिघेंचे संपूर्ण व्यक्तीमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. पण असे व्यक्तीमत्त्व असणा-या आनंद दिघे यांचे शत्रू काही कमी नव्हते. त्यातलाच एक म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम. दाऊदच्या तावडीतून आनंद दिघे वाचल्याची ही गोष्ट.
दाऊद इब्राहिम या अंडरवर्ल्ड डाॅनने भरदिवसा आनंद दिघेंना ठार मारण्याची योजना आखली होती. मात्र एका मराठमोळ्या माणसाच्या प्रसंगावधानामुळे आनंद दिघेंचा जीव वाचला.
असा आहे प्रसंग
आनंद दिघे यांच्याकडे गाडी नव्हती, पण आपल्या साहेबांकडे गाडी असावी असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. म्हणून, पैसे जमा करुन कार्यकर्त्यांनी साहेबांसाठी एक गाडी घेतली. त्या गाडीवर शिलोत्री नावाचे वाहक ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आनंद दिघे यांनी याच गाडीचा वापर केला. एके दिवशी आनंद दिघे काही शिवसैनिकांसह मीरा रोड येथे पुजेसाठी निघाले होते. त्यावेळी गाडी ठाण्याबाहेर पडल्यानंतर, वाहक गिरीश शिलोत्री यांना काहीतरी संशयास्पद असल्याचे जाणवले. ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर, एक गाडी आपला पाठलाग करत असल्याचे त्यांना समजले.
( हेही वाचा: ज्ञानवापी मशीद तेव्हाच जमीनदोस्त झाली असती, पण… )
असे वाचले आनंद दिघेंचे प्राण
आनंद दिघेंना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने, वाहक गिरीश शिलोत्री सावध झाले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या या गाडीमुळे दिघेंच्या जीवाला धोका असल्याचे शिलोत्री यांनी हेरले. त्यांनी अधिक निरिक्षण केले आणि त्यात कुख्यात गुंड असल्याचे, शिलोत्री यांना समजले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत, गाडी थेट मीरा रोड पोलीस स्टेशनकडे वळवली. गाडी पोलीस स्टेशनकडे जाऊन थांबल्याने, दाऊदच्या गुंडांनी आपली गाडी वळवली आणि अशाप्रकारे धर्मवीर आनंद दिघेंचे प्राण वाचवण्यात शिलोत्री यांना यश आले.
Join Our WhatsApp Community