मध्य रेल्वेने दि. १० मे ते १४ मे या कालावधीत मुंबई विभागातील ११६ स्थानकांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत शाळा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, स्काऊट्स आणि गाईड्स, सफाई कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षक आणि विविध शाखा आणि स्थानकातील कर्मचारी अशा एकूण ५,९०० व्यक्तींनी सहभाग घेतला. ही मोहीम मध्य रेल्वे, मुंबई विभागातील मेनलाइन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन, घाट विभागांवरील ६६ प्रमुख स्थानकांवर संपूर्णत: राबविण्यात आली.
(हेही वाचा – ‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास!)
सिंगल युज प्लॅस्टिक बंदीची शपथ
‘रोज स्वच्छतेची खात्री’ या उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन नवीन प्रयत्न केले जातात. पहिल्या दिवसाची सुरुवात मुख्य आरोग्य निरीक्षक व स्थानक व्यवस्थापक, अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन आणि सिंगल युज प्लॅस्टिक बंदीची शपथ घेऊन केली. स्वच्छतेबद्दल आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या उदा. प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक प्लेट्स, स्ट्रॉ, कप, थर्माकोल प्लेट्स इ. सिंगल यूज प्लॅस्टिक (एसयूपी) बंदीबाबत सफाई कर्मचाऱ्यांशी संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले.
मुंबई विभागातील स्थानकांवर रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रेल्वे वापरकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छता अभियान कार्यक्रमाबाबत आपल्या स्वतःच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच स्थानक परिसराची स्वच्छता राखण्याबाबत जागरूक केले. स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातून एकेरी वापराच्या प्लास्टिकचे निर्मूलन करण्याची शपथ घेऊन रेल्वे वापरकर्त्यांनी त्यांचा सक्रिय सहभाग दर्शविला. रेल्वे निरीक्षकांनी स्टेशन परिसर, बुकिंग कार्यालये, स्वच्छतागृहे स्वच्छ करून स्वच्छतेची खात्री देखील केली.