राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शिवसेनेसोबत 25 वर्षे युतीत असलेल्या भाजपकडून यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली. पण आता शिवसेनेचे मंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडी पहायला आज बाळासाहेब हवे होते, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन पुन्हा एकदा भाजपने टीकास्त्र सोडलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
मुंबई विद्यापिठात बाळासाहेबांच्या फोटोंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीबाबतच्या आठवणी आदित्य ठाकरे यांनी सांगितल्या. शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री ही फार वर्षानुवर्षांची होती. कधीतरी मला खूप वेळा वाटतं की, ही महाविकास आघाडी सरकारची मैत्री बघायला आज बाळासाहेब असायला हवे होते, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले.
भाजपचे टीकास्त्र
आदित्य ठाकरे यांच्या या विधानावरुन विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. सत्तेसाठी चालू असलेलं हे लांगुलचालन आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंचा मेंदू हा करप्ट झाला असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community