संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करताना पोलीस ताब्यात घेत असताना, पळून जाण्याच्या प्रयत्नात महिला पोलिसांना धक्का लागल्यानंतर, मुंबई पोलीस संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेत होते. मात्र, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर, संदीप देशपांडे पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत, त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिला पोलिसांना धक्का लागल्याचे एक तरी फूटेज दाखवा, मी आता राजकारण सोडतो, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
उद्या आमची वेळ येईलच
आम्ही जर त्या महिला पोलिसांना धक्का मारला होता, तर त्या महिला पोलिसांना रजेवर का पाठवले? त्यांना सक्तीची रजा का दिली त्यांना मीडियासमोर का आणले नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी यावेळी केला. आम्ही आघाडी सरकार विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी सरकारने गुन्हे दाखल केले होते. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आज त्यांचं सरकार आहे. त्यांना वाटेल तसं ते करत आहेत. उद्या खुनाचा गुन्हाही ते दाखल करतील, असे सांगतानाच आज तुमचे सरकार आहे, जे कारायचे आहे ते करा उद्या आमचीही वेळ येईलच, असे म्हणत देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला.
( हेही वाचा: ‘औरंगजेब लेन’ नावाच्या जागी ‘बाबा विश्वनाथ मार्ग’ असे भगवे पोस्टर! )
आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार?
राज ठाकेरंचा अयोध्या दौरा का रद्द करण्यात आला? याबाबत राज ठाकरे स्वत: बोलतील असेही संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच, संजय राऊत यांच्या टीकेलाही संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. आमचे नगरसेवक चोरणारे आम्हाला काय मदत करणार? असा खोचक सवाल देशपांडे यांनी शिवसेनेला केला आहे.
Join Our WhatsApp Community