राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणा-या सचिन वाझेच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेने आपल्या जामिनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. पण वाझेचा हा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
विशेष न्यायालयात सुनावणी
वाझेने मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी ईडीकडे प्रस्ताव दिला होता. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हा या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा मुख्य दुवा आहे. मागील सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत त्याच्याविरुद्ध प्रक्रिया जारी केल्यानंतर वाझेने विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल राकडे यांच्याकडे वकील सजल यादव आणि हर्ष गांगुर्डे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आता मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
(हेही वाचाः बँकांची कामं लवकर उरका! येत्या १० दिवसांत बँकांचा संपाचा इशारा)
न्यायालयात युक्तिवाद
अँटिलिया स्फोटके प्रकरणी आणि मनसुख हिरेनच्या खुनाप्रकरणी एनआयएने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला अटक केली होती. वकील यादव यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी वाझेसाठी जामीन मागितला, त्यामुळे त्याला ईडीने अटक केली नाही. जर वाझेला जामीन दिला गेला तर तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो आणि परिणामी तपासात अडथळा आणू शकतो, कारण तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे आणि त्याचे उच्च पदावरील राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी संबंध आहेत, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community