राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ब्राह्मणविरोधी आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती, त्यानंतर पवारांनी जाहीर सभेत कविता वाचन करून हिंदूंच्या देवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला, त्यावरून अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांवर टीका करणारी पोस्ट व्हायरल केली. अशा प्रकारे सध्या शरद पवारांवर ब्राह्मण विरोधी असल्याचा आरोहा घट्ट होत आहे. अशा वेळी पवारांनी ब्राह्मण समाजातील संघटनांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मात्र ब्राह्मण महासंघाने हे निमंत्रण नाकारले आहे.
राष्ट्रवादीच्या इस्लामपूरच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची चेष्टा केली. तर कोल्हापूरच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाला लक्ष्य करताना पुजाविधी करणे हा ब्राह्मण समाजाचा धंदा आहे, असे वक्तव्य केले. शरद पवारांनी देखील एका सभेत शाहू महाराज-ज्योतिषाचे उदाहरण दिले. एकंदरितच अशा वक्तव्यातून राष्ट्रवादीचे ब्राह्मण समजाबाबतचे मत दिसून येते. पवारांनी ब्राह्मण समाजाबाबत पहिल्यांदा त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नंतरच आम्ही चर्चेला जाऊ, असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावले आहे.
राष्ट्रवादीचे काय आहे म्हणणे?
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी ब्राह्मण समाजाविरोधात आहे, असा अपप्रचार केला गेला. जी राष्ट्रवादीची बाजू नाही, भूमिका नाही, असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल केले गेले. त्याचमुळे ब्राह्मण समाज राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. परंतु झालेले गैरसमज दूर व्हावे, यासाठी शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. शनिवारी, २१ मे रोजी ही बैठक पुण्यात पार पडणार आहे, असे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community