महापालिकेनेच आम्हाला फसवले! खार येथील घराविषयी रवी राणांचा आरोप 

130
महापालिका आमच्या खार येथील घरावर अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत आमच्या घरावर कारवाई करणार असेल, तर आमचा आरोप आहे की, आम्ही ज्या बिल्डरकडून हे घर घेतले आहे, त्या घराच्या इमारतीचा प्लॅन महापालिकेने मंजूर केला आहे, मग जर बिल्डरने आम्हाला फसवले असेल, तर बिल्डरचा प्लॅन मंजूर करून महापालिकेनेही आमची फसवणूक केली आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

मुंबईत सर्व अनधिकृत इमारतींचे मोजमाप करा! 

‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत आले होते, मात्र त्यांना शिवसैनिकांनी विरोध केल्यानंतर ते खार येथील त्यांच्या घरीच थांबले होते, तेथून त्यांना पोलिसांनी अटकही केली. मात्र त्यानंतर लागलीच महापालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील घरावर नोटीस लावून त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला. याप्रकरणी शनिवारी, २१ मे रोजी रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना उपरोक्त आरोप करत आम्ही ज्या बिल्डरकडून घर घेतले, त्या बिल्डरच्या याच भागात १५-२० इमारती आहेत, त्यांचेही मोजमाप महापालिका करणार का, तसेच मुंबईत अनेक अनधिकृत इमारती आहेत, त्यांचेही मोजमाप महापालिका करणार का, अशी विचारणा केली. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतो म्हणून जर महापालिका नारायण राणे आणि आमच्या घरांवर कारवाई करणार असेल तर ही कारवाई सूडबुद्धीची आहे, असेही रवी राणा म्हणाले. आम्ही महापालिकेचा जो काही दंड असेल तो भरायला तयार आहोत, असेही आमदार राणा म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.